बाळासाहेब पाटील : पुढारी ऑनलाईन
शिवरायांचा आवडता किल्ला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ जेथे रोवली तो तोरणागड आजही शिवप्रेमींना साद घालतो. सध्या हा गड वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी येथील तटबंदी काही भुरट्या चोरांनी उखडून टाकली. याचे कारण म्हणजे अजूनही अनेकांना वाटते की, या गडाच्या उदरात सोन्यांच्या मोहरांचे हंडे सापडणार आहेत. वास्तविक तटबंदी आणि गडांवर आता असले कुठलेही गुप्तधन नसून त्या लालसेपोटी गडावर बेकायदा उत्खनन करणे म्हणजे विद्रुपीकरण आहे.
तर ज्या तोरणागडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले त्या तोरणागडाचे इतिहासात अनन्य साधारण महत्त्व आहे. समुद्रसाटीपासून ४६०६ फूट उंचीचा हा गड गगनाला भिडला आहे. शिवाजी महाराजांनी गड ताब्यात घेतल्यानंतर इमारतीचे बांधकाम करताना पाया खणताना तेथे सोन्याच्या मोहरांचा हंडा सापडला होता. तोरण्यावर स्वराज्याची शपथ घेतली असली तरी त्या काळात राजांनी अनेक गडांचे बांधकाम काढले होते. यापैकी राजगड हा राजधानीचा गड बांधण्याचे काम वेगाने सुरू होते. मात्र, आर्थिक चणचणीमुळे हा गड थांबला होता. परंतु तोरण्यावर सापडलेल्या धनामुळे या गडाचे बांधकाम पुर्ण झाले, असे म्हटले जाते. याबाबत दुर्गअभ्यासक भगवान चिले यांच्या गडकोट या पुस्तकात याबाबत लिहिले आहे, ' स्वराज्य स्थापनेच्या प्रारंभीच्या काळात जे दुर्ग जिंकले त्यापैकी तोरणा हा महत्त्वाचा गड. हा गड जिंकल्यानंतर येथे गडाची दुरुस्ती आणि नवीन बांधकाम सुरू झाले. त्यांच्या पायात मोहरांचा हंडा सापडला. शिवाजी महाराजांनी तोरणा गडाचा प्रचंड विस्तार पाहून गडाचे नाव प्रचंडगड असे ठेवले. पुरंदरच्या तहात तोरणा महाराजांनी स्वत:कडे ठेवून घेतला. सन १६७१ -७२ च्या सुमारस तोरणा दुरुस्तीसाठी पाच हजार होन खर्च करण्यात आले होते.'
औरंगजेबाने तयार केला होता नकाशा
छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंत मोगली सैन्यांना तोरणा जिंकता आला नाही. मात्र, १३ ऑगस्ट १६९४ रोजी हा किल्ला मोगलांनी जिंकला. मात्र, लवकरच हा किल्ला मराठ्यांनी जिंकून घेतला. पुढे १७०३ मध्ये औरंगजेब पुण्यात तळ ठोकून होता. त्याने आपला सरदार फत्तेउल्लाखान याला तोरण्याची टेहळणी करण्यास पाठवले. त्याने गडाची पाहणी करून नकाशा तयार केला. तो नकाशा औरंगजेबापुढे मांडला. रसद अपुरी असल्याचे लक्षात आल्यानंतर औरंगजेबाने तयारी केली. पुढे राजगड जिंकल्यानंतर १७०४ मध्ये औरंगजेब स्वत: तोरणा जिंकायला आला. त्याने तटाला दोर लावून सैन्य आत घुसवले. घमासान लढाई झाल्यानंतर गड ताब्यात आला.
मोगल किल्लेदार झाला होता हैराण
मराठ्याच्या ताब्यातून हा किल्ला घेतल्यानंतर १६९० च्या दरम्यान येथे मोगल किल्लेदार हातमखान तैनात होता. त्याचे एक पत्र या किल्ल्याचे महत्त्व आणि दुर्गमता सिद्ध करते. भगवान चिले यांच्या गडकोट या पुस्तकात या पत्राचा मराठी अनुवाद दिला आहे.
तो म्हणतो, आयुष्याची सत्तरहून काही अधिक वर्षांपर्यंत मी धर्मनिष्ठ मुसलमान म्हणून काढली. पण दैवाच्या विलक्षण तडाख्यामुळे मी आता तोरण्यावर येऊन पडलो आहे. हे स्थळ तिटकारा करण्यासारखे आहे. तोरणा म्हणजे मूर्तीमंत कैदखानाच. मी दुर्गम मार्क आणि संकटमय घाट पार करून तोरणा किल्ल्याच्या पायथ्याला आलो. पायथ्यापासून टोकापर्यंत साखळेने मोजले तरी दोन कोसांची लांबी असावी. त्यापैकी दीड कोसापर्यंत रस्ता काहीसा घोड्यावर बसून तर काहीसा पायी चालून पार करता येईल. यानंतर स्वारांसाठी अगर पायी चालण्यासाठी वाट अशी नाही. किल्ल्याच्या एका बाजुला खोल दरी. खोल दरी म्हणजे सात पाताळापैकी अगदी खालचा नरक आहे. किल्ल्यावर जायण्यास वाट नाही. तेथे जाण्यासाठी डोंगरात पायऱ्या काढल्या आहेत. त्या अतिशय ओबडधोबड आहेत. धडधाकट, तरुण, मजबूत माणसेही काकुळतीला येतात. मग माझ्यासारख्या म्हाताऱ्याची काय कथा? किल्ला अतिशय लांब आणि रुंद आहे. या पृथ्वीवरील डोंगर या किल्ल्याच्या पासंगास पुरणार नाही. पावसाळ्यात पावसाचे पाणी घरात घालपर्यंत घुसते. किल्ल्यावरील लोकांची अवस्था केविलवाणी होते आणि निरनिराळे रोग पसरतात.'
या किल्ल्याबात जेम्स डग्लस याने पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. सिंहगड सिंहाची गुहा असेल तर तोरणा गरुडाचे घरटे आहे. मोगली किल्लेदाराने पाठविलेले पत्र वाचल्यानंतर हे गरुडाचे घरटे का आहे याची प्रचिती येते.