सरकारी कर्मचार्‍यांना कॅशलेस आरोग्य सुविधा

बेळगाव : प्रतिनिधी

सरकारी कर्मचार्‍यांना वेतनवाढ, चौथ्या शनिवारी सुटी जाहीर केल्यानंतर आता बर्‍याच दिवसांपासूनची कॅशलेस वैद्यकीय सुविधांची मागणी सरकारने पूर्ण केली आहे. त्यानुसार राज्यातील 800 पेक्षा अधिक खासगी रुग्णालयांत कर्मचार्‍यांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा मिळणार आहेत.

सध्या सरकारी कर्मचार्‍यांसाठी 'ज्योती संजिवनी' योजना जारी आहे. पण, याचा कर्मचार्‍यांना फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे सुवर्ण आरोग्य ट्रस्टमध्ये नोंद केलेल्या राज्यातील 800 रुग्णालयांतून वैद्यकीय सुविधा मिळवण्याची संधी देण्यात आली आहे. वैद्यकीय सुविधांसाठी कर्मचार्‍यांच्या वेतनातून मासिक 200 रुपये कापून घेतले जातात. नव्या योजनेंतर्गत मासिक 400 रुपये कापून घेण्यात येणार आहेत. सुमारे 1200 प्रकारच्या शस्त्रक्रिया, रुग्णालयात दाखल केल्यानंतरचा खर्च, बाह्यरुग्ण म्हणून घेतलेला उपचार आदी कॅशलेस असणार आहे.

पाच वर्षांपूर्वी पोलिसांसाठी 'आरोग्य भाग्य' योजना जारी करण्यात आली होती. त्याच धर्तीवर सरकारी कर्मचार्‍यांनाही सुविधा देण्याची मागणी करण्यात येत होती. ही मागणी आता पूर्ण करण्यात आली असून लवकरच आदेश जारी केला जाणार आहे. 

ज्योती संजिवनी योजनेंतर्गत मेंदूतील रक्तस्त्राव, कॅन्सर, हृदयरोग, मूत्रपिंड निकामी होणे आदी सहा प्रकारच्या आजारांवर उपचार केले जात होते. उर्वरित आजारांसाठी पैसे भरुन ते काही दिवसांनी परत देण्याची व्यवस्था होती. पण, संबंधित रक्कम अनेक दिवस येत नव्हती.आली तरी त्यातील काही टक्के रक्कम कपात केली जात होती. 'सी' आणि 'डी' दर्जाच्या कर्मचार्‍यांना याचा त्रास सहन करावा लागत होता.

मदतनिधीत वाढ

सरकारी कर्मचार्‍याचे निधन झाल्यास त्याच्या अंत्यसंस्कारासाठी शासनाकडून 5 हजार रुपये दिले जातात. ही रक्कम 15 हजार रुपये इतकी करण्यात आली आहे. अर्थ खात्याने वाढीव मदतीस मंजुरी दिली असून लवकरच आदेश जारी केला जाणार आहे. 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news