मुंबई : पुढारी वृत्तसेवा
नवी मुंबईमध्ये होणा-या आंतरराष्ट्रीय विमानतळाला खासदार शरद पवार यांचे नाव द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (अल्पसंख्यांक विभाग) मुंबईत आंदोलनाद्वारे केली.
शरद पवार यांचे राजकिय, सामाजिक जीवनात चांगले योगदान आहे. सलग 54 वर्षे ते राजकारणात कार्यरत आहे. त्यामुळे त्यांचे नांव या आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे, असे प्रदेश उपाध्यक्ष मोहम्मद हाजी मोमीन यांनी आझाद मैदानाच्या मुख्यप्रवेद्वाराजवळ केलेल्या आंदोलनावेळी केली.
शरद पवार यांनी केंद्रात संरक्षण मंत्री, कृषीमंत्री, राज्यात मुख्यमंत्री तसेच बीसीसीआय क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष व राज्यसभा खासदार अशा अनेक पदांचा कार्यभार सांभाळला आहे. सतत ते जनतेत कार्यरत आहेत. लातूर जिल्हयातील किल्लारी भूकंपग्रस्तांना मदत, 1978 ला मुख्यमंत्री असताना सेंट्रल हज कमिटी मुंबईची जागा मुस्लिम बांधवांना उपलब्ध करुन दिली, स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना 33 टक्केनंतर 50 टक्के आरक्षण केले. मौलाना आझाद वित्तीय महामंडळ स्थापन, मराठवाडा विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठ असे नामांतर केले, अशी अनेक लोकहिताची कामे शरद पवार यांनी केली आहेत. त्यांच्या कामाची दखल घेऊन नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला शरद पवार यांचे नांव द्यावे.