पूरग्रस्त शेतकर्‍यांना प्रतीक्षा कर्जमाफीची | पुढारी

Published on
Updated on

बोरगाव : विजय शिंदे

वारणा-कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे तालुक्यातील 37 गावांना फटका बसला आहे. या गावांतील शेतकरी सर्व बाजूंनी उद्ध्वस्त झाले आहेत. दोन महिने उलटले तरी शासनाकडून पूरग्रस्त शेतकर्‍यांना जाहीर करण्यात आलेली कर्जमाफी व नुकसान भरपाई अद्यापही मिळालेली नाही. वाळवा तालुक्यातील 43 हजार शेतकरी त्याची प्रतीक्षा करीत आहेत. 

ऑगस्टमध्ये वारणा-कृष्णा नद्यांना आलेल्या महापुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ऊस, केळी, द्राक्षे अशी हुकमी पिके पाण्यात गेली. त्यामुळे शेतकर्‍यांचे एकरी लाखो रुपयांचे नुकसान झाले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांनी कर्जमाफीचे  शेतकर्‍यांना आमिष दाखवत मते मागितली. 

जाहीर सभांच्या व्यासपीठावरून आम्ही शेतकर्‍यांना कर्जमाफी देऊ, आम्ही सत्तेवर आलो तर  पहिला विषय हा कर्जमाफीचा असेल. आम्ही तो निकाली काढू, असे सांगितले होते. काही पक्षांच्या नेत्यांनी तर शेतकर्‍यांचा 7/12 कोरा करणार असल्याची हमी दिली होती. त्या घोषणा प्रत्यक्षात येण्याची शेतकरी वाट पाहत आहेत.

तत्कालीन शासनाने पूरबाधित क्षेत्रावर असणार्‍या पीक कर्जाची कर्जमाफी करू, अशी घोषणा केली होती. एक हेक्टरच्या आत क्षेत्र असलेल्या  शेतकर्‍यांच्या पीक कर्जाची कर्जमाफी होणार आहे. त्यामुळे हे शेतकरी सध्या त्या कर्जमाफीची प्रतीक्षा करीत आहेत. 

पूरपरिस्थिती ओसरताच शासनाच्या कृषी विभागाने  पूरबाधित क्षेेत्राचे पंचनामे केले.  त्या पूरपट्ट्यात येणार्‍या क्षेत्राच्या गट नंबरच्या आधारे सेवा सोसायट्या, बँका यांच्याकडून शासनाने 22 ऑगस्ट  2019 अखेरचे पीक कर्ज व 31 ऑगस्ट अखेरचे व्याज अशी एकत्र माहिती घेण्यात आली. या पीक कर्जाच्या माहितीची बँक पातळीवर तपासणी करण्यात आली. त्यानंतर या पीक कर्ज यादीची शासकीय तपासणी करून शासनाकडे सादर करण्यात आली. परंतु अद्यापही या शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळालेली नाही. 

शेतकरी, सेवा सोसायट्याही अडचणीत

पूरबाधित क्षेत्रावरील कर्ज हे कर्जमाफीला पात्र ठरल्यामुळे त्या क्षेत्रावर सोसायट्या, बँकांकडून नवीन कर्ज मिळत नाही.  मात्र बाधित क्षेत्रात दुसरे पीक घेण्याशिवाय शेतकर्‍याला  पर्याय नाही. मात्र नवीन कर्ज मिळत नसल्याने लागवडीचा खर्च कसा करायचा, हा प्रश्न आहे.

 पीक कर्जाची माहिती व्याजासह  ऑगस्टअखेर दिली आहे. नोव्हेंबर उजाडला तरीदेखील अद्याप कर्जमाफी लालफितीत अडकली आहे. त्यामुळे  पीककर्जाच्या  व्याजाचा भुर्दंड हा सेवा सोसायट्या व बँकांवर पडणार आहे. त्यामुळे या सहकारी संस्थाही अडचणीत येण्याची शक्यता आहे. साहजिकच बाधित क्षेत्रातील नुकसान आणि  नव्याने कर्ज मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.

पूरग्रस्तांसाठी शासनाने निवडणुकीच्या तोंडावर अनेक घोषणा केल्या. प्रत्येक कुटुंबाला सानुग्रह अनुदान व  तीन महिने मोफत धान्य मिळाले. परंतु  पूर कालावधीत विस्थापित झालेल्या कुटुंबांना जाहीर झालेला विस्थापित भत्ता अजूनही बहुसंख्य गावांत मिळालेला नाही. त्याचबरोबर घरांच्या पडझडीची नुकसान भरपाई मिळालेली नाही. \कर्जमाफीशिवाय कर्ज नसणार्‍या शेतकर्‍यांंना गुंठा 135 रुपयाच्या तिप्पट नुकसान भरपाई, अशी घोषणा करण्यात आली होती. परंतु ती घोषणाही अंमलात आलेली नाही. 

महापुराबरोबर अतिवृष्टीचा फटका…

वाळवा तालुक्यातील कृष्णा-वारणाकाठच्या 30 गावांना महापुराचा फटका बसला आहे. त्याचबरोबर 14 गावांतील पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला असून, या 44 गावांतील 42 हजार 969 शेतकर्‍यांच्या 16 हजार 985 हेक्टर  क्षेत्रावरील पिकांना महापूर व अतिवृष्टीचा फटका बसला आहे. हे बाधित शेतकरी कर्जमाफी व अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईची प्रतीक्षा करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news