जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघात एकूण 32 उमेदवार रिंगणात असून, आघाडी आणि महायुतीमध्ये दुरंगी लढती होणार आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीकडून चार, तर काँग्रेसकडून एक उमेदवार रिंगणात आहे. त्यांच्याविरोधात शिवसेनेकडून पाच उमेदवार आहेत.
जिल्ह्यात मंडणगड-दापोली खेड, चिपळूण-संगमेश्वर आणि गुहागर या तीन ठिकाणी चुरशीच्या लढती अपेक्षित आहेत. मात्र, रत्नागिरी-संगमेश्वर आणि राजापूर-लांजा-साखरपा मतदारसंघ या दोन ठिकाणच्या लढती महायुतीसाठी एकतर्फी आहेत. विद्यमान आमदारांमध्ये राष्ट्रवादीच्या संजय कदम, शिवसेनेच्या उदय सामंत, राजन साळवी, सदानंद चव्हाण आणि राष्ट्रवादीच्या आमदारकीचा राजीनामा देत शिवसेनेत दाखल झालेले भास्कर जाधव यांचे भवितव्य मतदारांच्या हातामध्ये आहे.
मंडणगड-दापोली-खेड विधानसभा मतदार संघातून 11 उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेनेकडून योगेश रामदास कदम, राष्ट्रवादीकडून संजय वसंत कदम यांच्यात लढत होणार आहे. येथे संजय कदम नावाचे चार, तर योगेश कदम नावाचे दोन उमेदवार रिंगणात आहेत. नावसार्धम्यामुळे मतदारांना 'कन्फ्युज' करून, मतांची विभागणी करण्याची रणनीती या मतदार संघात आखण्यात आल्याचे दिसते. मंत्री रामदास कदम यांच्यापुढे पुत्राला निवडून आणण्याचे 'लक्ष्य' आहे. तर आ. संजय कदम यांना आपली आमदारकी टिकविण्याचे आव्हान आहे. या दोघांमध्ये सूर्यकांत दळवी, अनंत गीते, भाजपचे केदार साठे, मनसेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांची साथ कुणाला उघड आणि कुणाला छुपी मिळते, यावर येथील गणित अवलंबून आहे.
चिपळूण-संगमेश्वर मतदार संघात आघाडीच्या शेखर निकम यांचे महायुतीचे विद्यमान आमदार सदानंद चव्हाण यांच्यापुढे आव्हान आहे. या मतदार संघात असणार्या तिवरे धरण फुटले आणि खेमराज कन्स्ट्रक्शनच्या निकृष्ट कामावरून आ. सदानंद चव्हाण टीकेचे लक्ष्य बनले. शेखर निकम यांनी मतदार संघातील पाण्याचे दुर्भिक्ष्य कमी करण्यासाठी गावागावांमध्ये विहिरी, नळपाणी योजना राबविली आहे. मात्र, ही लढत तुल्यबळ होईल, यात शंका नाही. गुहागर मतदार संघात पूर्वाश्रमीचे शिवसैनिक व्हाया राष्ट्रवादी करीत पुन्हा शिवबंधनात अडकलेले माजी आमदार भास्कर जाधव आणि शिवसेनेतून राष्ट्रवादीत डेरेदाखल झालेले सहदेव बेटकर यांच्यात 'सामना' होणार आहे. येथे होणारी लढत तुल्यबळ अशीच आहे. या मतदार संघात कुणबी फॅक्टर महत्त्वाचा आहे. ज्याच्या मागे हा समाज राहिला, त्याचा मार्ग सुकर होतो, असा इतिहास आहे.
रत्नागिरी-संगमेश्वर मतदार संघात खरी लढत ही शिवसेना आमदार उदय सामंत व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष व नगरसेवक असलेले सुदेश मयेकर यांच्यात आहे. महायुतीतर्फे पाच वर्षांपूर्वी शिवसेनेत येऊन शिवसैनिक झालेले पूर्वाश्रमीचे 'राष्ट्रवादी' नेतृत्व आणि विद्यमान शिवसैनिक आमदार उदय सामंत यांच्यासाठी एकतर्फी लढत मानली जात आहे. या मतदार संघात आघाडीकडून सुदेश मयेकर हा नवखा उमेदवार रिंगणात आहे. त्यामुळे शिवसेनेच्या आमदार उदय सामंत यांना चौथ्यावेळची ही निवडणूक अगदी सोपी आहे.
राजापूर-लांजा-साखरपा येथे खरी लढत महायुती आणि आघाडी यांच्यात होणार आहे. आमदार राजन साळवी हे महायुतीचे उमेदवार आहेत. त्यांच्यापुढे आघाडीकडून काँग्रेसचे अविनाश लाड रिंगणात आहेत. लाड यांचे सामाजिक कार्य त्यांची जमेची बाजू आहे, तर आ. साळवींचा सामाजिक प्रभाव ही आ. साळवी यांची जमेची बाजू आहे.