ठाणे : पुढारी वृत्तसेवा
मराठी – हिंदी चित्रपट तसेच मालिकांचे प्रसिध्द कला दिग्दर्शक राजू साप्ते (51) यांनी पुण्यातील राहत्या घऱी गळफास घेवून आत्महत्या केली. फिल्म स्टुडिओ आणि अलाईड मजदूर युनियनचे खजिनदार राकेश मौर्या यांच्या दादागिरीला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचा व्हिडीओ साप्ते यांनी आत्महत्येपूर्वी तयार केला तो शनिवारी दिवसभर व्हायरल झाल्याने मराठी – हिंदी मालिका तसेच चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडाली असून, या प्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
साप्ते यांच्या पश्चात आई, पत्नी आणि एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. साप्ते यांचे मुंबईतील कांदिवली मधील चारकोप मध्ये कुटुंबासह वास्तव्य होते. मात्र पुण्यातल्या ताथवडे येथील घरी जावून त्यांनी शुक्रवारी रात्री गळफास घेतला.
साप्ते यांनी व्हिडीओ बरोबरच चार पानी पत्रही आत्महत्येपूर्वी लिहले आहे. या पत्रात त्यांनी लेबर युनियन लीडर गंगेश्वर श्रीवास्तव आणि राकेश मौर्या यांनीही केलेल्या पैशांच्या मागणी बद्दल लिहले आहे. राकेश मौर्या आणि गंगेश्वर श्रीवास्तव सारख्या नराधमांना कठोर शिक्षा मिळण्यासाठी मला आज हे कठोर पाऊल उचलावं लागत आहे, हे नमूद केले आहे.
साप्ते काय सांगून गेले?
नमस्कार, मी राजेश मारुती सापते. मी आर्ट डायरेक्टर आहे. मी कोणत्याही प्रकारची नशा केलेली नाही. मी पूर्ण विचारांती हा निर्णय घेत आहे. कारण मला काही गोष्टींचा खूप त्रास होत आहे. त्यातली ही गोष्ट आहे की, राकेश मोरया लेबर युनियन हे खूप त्रास देत आहेत. माझं कुठच्याही प्रकारचं पेमेंट थकीत नाही. सगळं पेमेंट रेग्युलरली दिलं आहे. माझी कुठलीही कप्लेन्ट तिकडे नाही. राकेश मौर्या युनियन मधील काही लेबर लोकांना मुद्दामहून फोन करून त्यांच्याकडून वदवून घेत आहेत की, राजू साप्ते यांनी एक का देड दिया नहीं!हे कालही मी क्लीअर केलं आहे. नरेश मिस्त्री नावाच्या व्यक्तीने पण फोन करून विचारलं असता त्यांनी ही सांगितलं की माझं पेमेंट पूर्ण आहे. नरेश मिस्त्री यांनी सांगितलं की आजपर्यंत दादांनी कुठचंही पेमेंट अर्धवट केलेलं नाही. तरीही राकेश मौर्या हे मला खूप सतावत आहेत. ते माझं कुठचंही काम चालू करू देत नाहीत. सध्या माझ्याकडे पाच प्रोजेक्ट आहेत. ज्याचं मला, इमिजेट काम सुरू करायचं आहे. त्यातला एक प्रोजेक्ट काल मला 'झी'चा सोडून द्यावा लागला. बिकॉज मला ते कामच करू देत नाहीत. दशमी क्रियेशनचं काम चालू असताना ते त्यांनी थांबवलं आहे. या गोष्टींचा निषेध म्हणून मी आज आत्महत्या करत आहे. तरी मला न्याय देण्याचा प्रयत्न करावा.धन्यवाद
राम कदम कनेक्शन
फिल्म स्टुडियोज सेटिंग अॅन्ड अलॉईड मजदूर युनियनशी भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांचाही संबंध आहे. आपण 4 वर्षांपूर्वीच या संघटनेचा राजीनामा दिल्याचा दावा कदम यांनी तातडीने केला असला तरी साप्ते यांनी आत्महत्येपूर्वी केलेल्या व्हिडीओत ज्या राकेश मौर्या यांचे नाव घेतले आहे. त्या मौर्या यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या फलकांवर राम कदम यांचा फोटो दिसतो. आत्महत्येच्या बातमी आणि व्हीडिओसोबत राम कदम-मौर्या यांचे हे पोस्टरही शनिवारी व्हायरल झाले.
आघाडीचा कला दिग्दर्शक
जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून बाहेर पडल्यावर त्यांनी अजित आणि नंदू दांडेकर यांच्यासोबत सहाय्यक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. हिंदीतील प्रसिध्द कला दिग्दर्शक जयंत देशमुख यांच्यासमवेतही साप्ते यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांत सहाय्यक म्हणून काम केले. 2000 सालापासून त्यांनी स्वतंत्र काम करण्यास सुरुवात केले. मेहनत, प्रामणिकपणा याच्या बळावर राजू साप्ते यांनी मराठी आणि हिंदी मालिका आणि चित्रपटसृष्टीत ठसा उमटविला. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत तसेच मालिका या दोन्ही भाषांमध्ये तितक्याच ताकदीने काम करत स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारी फार कमी कलाकार, तंत्रज्ञ आहेत, त्यात साप्ते यांचे नाव आघाडीवर होते.
साप्ते यांनी केलेले चित्रपट
राजधानी एक्स्प्रेस, 1920लंडऩ, नाना-मामा, हापूस, येड्याची जत्रा, मन्या द वंडर बॉय, साटंलोटं, काय घडलं त्या रात्री,
मालिका
सरस्वती, आंबटगोड, गोलमाल, श्रीमान-श्रीमती, अग्गोबाई सुनबाई यांसारख्या अऩेक मालिका आणि चित्रपटांत त्यांनी कला दिग्दर्शक म्हणून काम केले.
स्वप्न अधुरे राहिले
साप्ते यांना भारतीय सैन्यावर चित्रपट करण्याची इच्छा होती, ती इच्छा त्यांनी ज्येष्ठ कला दिग्दर्शक जयंत देशमुख यांच्याशी बोलूनही दाखवली होती. मात्र आता त्यांचे स्वप्न अधुरेच राहिले.