नंदगावच्या तोतया अधिकार्‍यांना बेदम चोप

मुरगूड  :  प्रतिनिधी

बिद्री येथे खासगी दवाखाना  चालविणार्‍या एका डॉक्टरकडे वैद्यकीय प्रमाणपत्राची तपासणी करण्याच्या बहाण्याने आलेल्या चौघा तोतया लाचलुचपत अधिकार्‍यांना बिद्री ग्रामस्थांनी चांगलाच चोप दिला.दोघे संशयित तोतये चोप बसल्यानंतर घटनास्थळावरून पसार झाले.  त्यानंतर ग्रामस्थांनी दोघांना मुरगूड पोलिसांच्या ताब्यात दिले. प्रसाद बाळासो नलवडे (वय 28, रा. नंदगाव) आणि सचिन विलास मोहिते (वय 29, रा. नंदगाव) अशी संशयित तोतया अधिकार्‍यांची नावे आहेत.  

यासंबंधीची अधिक माहिती अशी शनिवारी सायंकाळी लाचलुचपत अधिकारी असल्याचा बहाणा करून आलेल्या तिघांनी बिद्री कारखाना साईटवर असलेल्या एका खासगी दवाखाना चालविणार्‍या डॉक्टरकडे  पैसे उकळण्याच्या उद्देशाने वैद्यकीय प्रमाणपत्रे दाखविण्याची मागणी केली; पण यासंदर्भात संबंधित डॉक्टरांना संशय आल्याने हे भामटे असावेत, असे वाटले त्यांनी तत्काळ शेजारी असणार्‍या लोकांना याची कल्पना दिली. जमावाने या तोतया अधिकार्‍यांचीच उलटतपासणी केली. बिद्री ग्रामस्थांनी हे तोतये असल्याचे ओळखून त्यांना चांगलाच चोप दिला व मुरगूड पोलिसांना दूरध्वनीद्वारे माहिती दिली.  पोलिसांनी घटनास्थळी येऊन संबंधित तोतये आधिकार्‍यांना ताब्यात घेतले व पोलिस ठाण्यात हजर करून चौकशी सुरू केली आहे.

दरम्यान, या तोतया आधिकार्‍यांना दिलेल्या चोपाची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. चौकशीअंती तोतया अधिकार्‍यांवर  गुन्हा दाखल होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, संशयितांकडून काहींना गंडा घातला गेल्याची शक्यता आहे. तोतयांचे आणखी दोघे साथीदार पळून गेल्याने त्यांचाही शोध सुरू आहे. पोलिसांनी संशयितांचा कसून तपास सुरू केला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news