जांबोटी: वार्ताहर
जास्त पाऊस पडणार्या कणकुंबी भागातील अनेक गावांना आता पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. गोवा कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या मानमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने दिवसा एका घराला चार घागर पाणी वाटून घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
या गावची लोकसंख्या सहाशेच्या घरात असून पारवाड पंचायतीमध्ये या गावचा समावेश आहे. गावात तीन कूपनलिका असल्या तरी त्यातील दोन कूपनलिकांना पाणीच नाही. एकाला पाणी आहे पण, त्याची दुरुस्ती रखडली आहे.
बंद असलेल्या सदर दोन कूपनलिका गेल्यावर्षी पाणी पुरवठा विभाग व जि.पं. तर्फे खोदण्यात आल्या होत्या. मात्र,त्यांना पाणी न लागल्याने त्याचा काहीच उपयोग होऊ शकला नाही. पाणी असलेल्या कूपनलिकेच्या दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. अशावेळी गावात एकमेव असलेल्या एका विहिरीतही पाण्याचे प्रमाण कमी असल्याने दिवसाला प्रत्येक घराला चार घागर पाणी वाटून घ्यावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.
नवीन विहिरीचे काम रखडले
या गावासाठी नवीन विहीर मंजूर करण्यात आली असून त्याचे खोदकामही करण्यात आले आहे. पण, कंत्रादाराने अर्धवट काम ठेवल्याने चौकीकडून येणारा पाणीपुरवठा बंद पडला आहे. त्यामुळे पाणी असून पाणी, पाणी म्हणण्याची वेळ गावकर्यांवर आली आहे. असे असताना कंत्राटदाराचे दुर्लक्ष झाले
आहे.
Tags : house,towers water each day,belgaon news