मुंबई; पुढारी ऑनलाईन: मनसुख हिरेन हत्याप्रकरणी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर छापेमारी करण्यात आल्यानंतर त्यांना आता एनआयएकडून अटक करण्यात आली आहे. त्यांना २८ जूनपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. आज (ता.१७) सकाळी सहा वाजल्यापासून एनआयएचे पथक अंधेरी येथील शर्मा यांच्या घरी तपास करत आहे.
वाचा : मनसुख मृत्यूप्रकरणात वाझेंचा सहभाग?
मनसुख हिरेन हत्या प्रकरणात पोलिस अधिकारी सचिन वाझे याआधीच एनआयएच्या ताब्यात आहे. एन्काऊंटर स्पेशालिस्ट शर्मा हे काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत दाखल झाले होते. शर्मा आणि वाझे हे दोघे मित्र असल्याने त्यांच्याकडे संशयाची सुई जात होती.
वाचा: मनसुख हत्या; मुख्य संशयित सचिन वाझेच
रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवल्याच्या प्रकरणातील मुख्य साक्षीदार आणि ठाण्यातील व्यापारी असलेल्या मनसुख हिरेन यांच्या हत्येचे गूढ अद्यापही कायम आहे. वादग्रस्त चकमकफेम अधिकारी सचिन वाझे हेच या प्रकरणातील मुख्य संशयित असल्याचे एनआयएचे म्हणणे आहे. याप्रकरणी एटीएसने नरेश रमणिकलाल गोर (31) व विनायक बाळासाहेब शिंदे (51) या वाझे यांच्या दोन साथीदारांना याप्रकरणात बेड्या ठोकल्या आहेत.
सकाळी सहाच्या सुमारास एनआयएने प्रदीप शर्मा यांच्या घरावर छापा मारला. विशेष म्हणजे याठिकाणी मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात आला होता. सीआरपीएफही तैनात करण्यात आले. इतक्या मोठ्या प्रमाणात सुरक्षा दलांची तैनाती करण्यात आलेल्या विविध तर्क लावण्यात येत आहे.
या प्रकरणात यापूर्वी प्रदीप शर्मा यांची सलग दोन दिवस चौकशी झाली होती. त्यावेळी शर्मा यांचा मोबाइलही ताब्यात घेतला होता. याप्रकरणी संतोष शेलार आणि आनंद जाधव या दोघांना एनआयएने अटक केली होती. संतोष हा शर्मांच्या जवळचा आहे. तर शर्मा यांच्या पीएस फाऊंडेशनच्या दोघा जणांना चौकशीला बोलाविले होते.
वाचा : मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी दोघांना अटक, एक माजी पोलीस शिपाई तर, दुसरा बुकी