‘कृष्णा’त डॉ. सुरेश भोसलेंचा दिग्विजय

Published on
Updated on

कराड : पुढारी वृत्तसेवा

पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांचा करिश्मा पाहावयास मिळाला. सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या सर्व 21 उमेदवारांनी सरासरी 10500 च्या इतक्या मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला. मागील चार निवडणुकीतील सत्तांतराची परंपरा मोडीत काढत सहकार पॅनेलने विरोधी संस्थापक पॅनेल आणि यशवंतराव मोहिते रयत पॅनेलची अक्षरशः धूळदाण उडवली.

दरम्यान, संस्थापक पॅनेलला सरासरी 9200 तर रयत पॅनेलला 4300 एवढी मते मिळाली. दिग्विजयी सहकार पॅनेलला 20 हजारहून अधिक मते मिळाली.

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यासाठी विद्यमान चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील जयवंतराव भोसले सहकार पॅनेल, माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली संस्थापक पॅनेल आणि स्व. यशवंतराव मोहिते यांचे सुपुत्र माजी चेअरमन डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या नेतृत्वाखालील यशवंतराव मोहिते रयत पॅनेलमध्ये तिरंगी लढत झाली. कारखान्यासाठी मतदान होऊन हयात मतदारांचा विचार करता 36 हजार 960 मतदारांपैकी 34 हजार 530 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने तब्बल 91 टक्के मतदान झाले होते. मतदानाचा टक्का वाढल्याने निवडणूक निकालबाबत उत्सुकता वाढली होती.

गुरुवारी सकाळी आठ  वाजता मतमोजणीस सुरुवात झाली. सर्वप्रथम 74 टेबलवरील मतपेटीतील मतांचे गटनिहाय वर्गीकरण करण्यात आले. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीस सुरुवात झाली. 74 टेबलवरील मतपेटीतील मते पाहून सत्ताधारी सहकार पॅनेल आघाडी घेईल, असे चित्र सुरुवातीपासून होते. उलट सहकार पॅनेलला अपेक्षेपेक्षा जास्त मताधिक्य मिळाले. संस्थापक व रयत पॅनेलचा पूर्ण धुव्वा उडाला. दोन्ही पॅनेलचा एकही उमेदवार विजयापर्यंत पोहचू शकला नाही.  

डॉ. सुरेश भोसलेंना मिळाली अविनाश मोहितेंपेक्षा दुप्पट मते

सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या रेठरे बुद्रूक-शेणोली गटात सहकार पॅनेलचे प्रमुख चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांना 20278 मते मिळाली. बाजीराव निकम यांना 18539 मते मिळाली. तर माजी चेअरमन संस्थापक पॅनेलचे प्रमुख अविनाश मोहिते यांना 9961 मते मिळाली. 

अधिकराव निकम यांना 7939 मते मिळाली. रयत पॅनेलचे प्रमुख डॉ. इंद्रजित मोहिते यांना 4751  मते तर बापूसोा पाटील यांना 3385 मते मिळाली. या गटात 1060 मते अवैध ठरली. विद्यमान चेअरमन व दोन माजी चेअरमन असा परस्पर विरोधी सामना या गटात रंगला. मात्र, सहकार पॅनेलने बाजी मारली. सहकार पॅनेलचे दोन्ही उमेदवार 10 हजारांच्या मताधिक्यांने विजयी झाले.

वडगाव हवेली-दुशेरे गट

वडगाव हवेली-दुशेरे गटात सहकार पॅनेलचे तिन्ही उमेदवार 11995 मताधिक्क्यांने विजयी झाले. विद्यमान उपाध्यक्ष जगदीश जगताप यांना 19513 मते मिळाली. तर विद्यमान संचालक धोंडीराम जाधव यांना 20065 मते मिळाली. या पॅनेलचे तिसरे उमेदवार सयाजी यादव यांना 19404 मते मिळाली आहेत. 

प्रतिस्पर्धी संस्थापक पॅनेलचे उमेदवार विद्यमान संचालक अशोक जगताप यांना 9104 मते मिळाली. सर्जेराव लोकरे यांना 8699 मते मिळाली. तर उत्तम पाटील यांना 8404 मते मिळाली आहेत. रयत पॅनेलचे उमेदवार डॉ.सुधीर जगताप यांना 4559 मते मिळाली. बापूसो मोरे यांना 4196 तर तिसरे उमेदवार सुभाष पाटील यांना 4290 मते मिळाली आहेत.

काले-कार्वे गट

काले-कार्वे या गटात तिन्ही पॅनेलमध्ये मोठी चुरस निर्माण झाली होती. शिवाय प्रचारा दरम्यानही येथे क्रॉस वोटिंगची चर्चा वर्तवली जात होती. मात्र, मतदारांनी सहकार पॅनेलच्या तिन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्यांनी निवडून दिले. या गटात कारखान्याचे विद्यमान संचालक दयाराम पाटील यांना 20307 मते मिळाली. गुणवंतराव पाटील यांना 19726 तर निवासराव थोरात यांना 19647 मते मिळाली. तिन्ही उमेदवार सरासरी 11500 च्या मत्ताधिक्यांनी विजयी झाले.

विरोध संस्थापक पॅनेलचे उमेदवार पांडुरंग पाटील यांना 8770, विजयसिंह पाटील यांना 8493 तर सुजित थोरात यांना 8344 मते मिळाली. रयत पॅनेलचे उमेदवार अजित पाटील यांना 4180 मते मिळाली. सयाजीराव पाटील यांना 4193 तर दत्तात्रय थोरात यांना 4100 मते मिळाली. 

नेर्ले-तांबवे गट

या गटात सत्ताधारी सहकारी पॅनेलचे तिन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्यांनी विजयी झाले. या पॅनेलचे दत्तात्रय देसाई यांना 20109 मते मिळाली. लिंबाजी पाटील यांना 19347 मते तर संभाजीराव पाटील यांना 19801 मते मिळाली. प्रतिस्पर्धी  संस्थापक पॅनेलचे उमेदवार मारुती मोहिते यांना 8974, सुभाष पाटील यांना 8827 तर विक्रमसिंह पाटील यांना 8624 मते मिळाली. रयत पॅनेलचे उमेदवार गणेश पाटील यांना 4204, प्रशांत पाटील यांना 4198 तर मनोहर थोरात यांना 3958 मते मिळाली.

रेठरे हरणाक्ष-बोरगांव गट

रेठरे हरणाक्ष-बोरगांव गटातही सहकार पॅनेलने बाजी मारली. या पॅनेलचे उमेदवार जयवंत मोरे यांना 20111 मते मिळाली. जितेंद्र पाटील यांना 20218 तर संजय पाटील यांना 19780 मते मिळाली. संस्थापक पॅनेलचे महेश पवार यांना 8869, शिवाजी पवार यांना 8560 तर उदयसिंह शिंदे यांना 8370 मते मिळाली. रयत पॅनेलचे उमेदवार विश्वासराव मोरे पाटील यांना 4416, विवेकानंद मोरे यांना 4208 तर अनिल पाटील यांना 4157 मते मिळाली. 

येडेमच्छिंद्र-वांगी गट

या गटात सहकार पॅनेलचे उमेदवार शिवाजी पाटील यांना 20155 मते मिळाली तर बाबासोा शिंदे यांना 19489 मते मिळाली. सहकार पॅनेलचे दोन्ही उमेदवार सरासरी 11 हजार मताधिक्यांनी विजयी झाले. विरोधी संस्थापक पॅनेलचे उमेदवार माणिकराव मोरे यांनी 8810, बाबासोा पाटील यांना 8432 मते मिळाली. रयत पॅनेलचे उमेदवार बापूसोा मोरे यांना 4257 मते, तर संजय पाटील यांना 4199 मते मिळाली.

अनुसूचित जाती जमाती गट

अनुसूचित जाती जमाती गटात विलास ज्ञानू भंडारे हे सहकार पॅनेलचे उमेदवार 11103 मताधिक्कांनी विजयी झाले. त्यांना एकूण 20333 मते मिळाली आहेत. त्यांच्या प्रतिस्पर्धी संस्थापक पॅनेलचे उमेदवार शिवाजी उमाजी आवळे यांना 9203 मते मिळाली आहेत. तर रयत पॅनेलचे उमेदवार प्रा.अधिकराव भंडारी यांना 4372 मते मिळाली.

इतर मागास गट

या गटात सहकार पॅनेलचे उमेदवार वसंतराव शिंदे 11140 मताधिक्यांनी विजयी झाले. त्यांना एकूण 20326 मते मिळाली आहेत. संस्थापक पॅनेलचे उमेदवार मिलिंद पाटणकर यांना 9186 मते मिळाली आहेत. तर रयत पॅनेलचे उमेदवार डॉ.शंकरराव रणदिवे यांना 4372 मते मिळाली आहेत.

विमुक्त जाती भटक्या जमाती

या गटात सहकार पॅनेलचे उमेदवार अविनाश रघुनाथ खरात 20134 मते मिळवून विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी संस्थापक पॅनेलचे उमेदवार नितीन शंकर खरात यांना 9954 मते मिळाली. तर रयत पॅनेलचे उमेदवार आनंदराव संभाजी मलगुडे यांना 4489 मते मिळाली आहेत.

महिला राखीव गट

या गटातून सहकार पॅनेलच्या दोन्ही महिला उमेदवारांनी सरासरी 11 हजारांचे मत्ताधिक्य घेवून विजय मिळविला. इंदूमती दिनकर जाखले यांना 19594 मते मिळाली आहेत. तर दुसर्‍या उमेदवार जयश्री माणिकराव पाटील यांना 19876 मते मिळाली आहेत. संस्थापक पॅनेलच्या मिनाक्षीदेवी संभाजी दमामे यांना 8919 मते तर विद्यमान संचालिका उमा देसाई यांना 8936 मते मिळाली आहेत. रयत पॅनेलच्या उषा पाटील यांना 4255 मते तर सत्वशील थोरात यांना 4694 मते मिळाली.

साडेआठ तास पहिल्या फेरीची मतमोजणी 

सकाळी आठ वाजता मतमोजणीस सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीतील सुमारे 3 लाख 25 हजारांहून अधिक मतांची मोजणी पूर्ण 74 टेबलवरील 300 कर्मचार्‍यांना सायंकाळी 5.45 चा अवधी लागला. जवळपास साडेआठ तास मोजणी सुरू होती. त्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास उर्वरित 74 मतदान केंद्रांवरील दुसर्‍या फेरीच्या मतमोजणीस प्रारंभ करण्यात आला होता. रात्री साडेदहा वाजता मतमोजणी पूर्ण झाली.

22 वर्षांतील सत्तांतराची परंपरा खंडित

1989 साली कारखान्यात स्व. यशवंतराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली रयत पॅनेलने सहकार पॅनेलचा पराभव करत प्रथम सत्तांतर घडवले होते. त्यानंतर 1999 साली सहकार पॅनेलने रयत पॅनेलचा पराभव करत दुसरे सत्तांतर घडवले होते. 2005 साली रयत पॅनेलने बाजी मारत तिसर्‍यांदा सहकार पॅनेलचा पराभव करत सत्तांतर घडवले होते. त्यानंतर 2007 साली मोहिते – भोसले मनोमिलन झाल्याने 2010 सालच्या निवडणुकीत अविनाश मोहितेंचे संस्थापक पॅनेल प्रथमच निवडणुकीला सामोरे गेले होते. या निवडणुकीत ऐतिहासिक सत्तांतर घडवत संस्थापक पॅनेल विजयी झाले होते. त्यानंतर 2015 साली तिरंगी लढत होऊन सहकार पॅनेलने संस्थापक पॅनेलचा पराभव केला होता. सलग 4 निवडणुकीत सत्तांतर झाल्यानंतर आता सहकार पॅनेलने सत्ता कायम राखत सत्तांतराची मागील 22 वर्षाची परंपरा खंडीत केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news