महामानवाला अभिवादनासाठी भीमसागर लोटला | पुढारी

Published on
Updated on

कोल्हापूर : प्रतिनिधी

'एकच साहेब… बाबासाहेब, 'जब तक सूरज-चाँद रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा', 'बोलो रे बोलो जयभीम'चा जयघोष सोबतीला बँड व पारंपरिक वाद्यांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, आकर्षक विद्युत रोषणाई, प्रबोधनपर फलक आणि निळे फेटे परिधान केलेले तरुण-तरुणी, माता-भगिनी अशा चैतन्यमयी वातावरणात विश्‍वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनासाठी रस्त्यावर भीमसागर लोटला. शनिवारी सायंकाळी सिद्धार्थनगरसह शहरातील विविध मंडळांतर्फे मिरवणुका काढण्यात आल्याने वातावरण 'भीममय' बनले होते. 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, शाळा, महाविद्यालयांत डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने बिंदू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, महापौर स्वाती यवलुजे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा परिषद शिक्षण समिती सभापती अंबरिश घाटगे, उत्तम कांबळे, शहाजी कांबळे, वसंतराव मुळीक, प्रा. विश्‍वास देशमुख, डी. जी. भास्कर, अ‍ॅड. पंडित सडोलीकर, बाळासाहेब भोसले, सुभाष देसाई यांच्यासह राजकीय पक्षांचे पदाधिकारी, मनपा नगरसेवक उपस्थित होते. शाहूपुरी पोलिस ठाणे जुन्या इमारतीच्या ठिकाणीही मध्यवर्ती जयंती उत्सव समितीतर्फे अभिवादन कार्यक्रम झाला. 

सिद्धार्थनगर विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले. सकाळी आ. सतेज पाटील यांच्या हस्ते ध्वजरोहण व प्रतिमापूजन झाले. त्यानंतर जिल्हा पोलिस प्रमुख संजय मोहिते यांनी सिध्दार्थनगर येथे डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन केले. सायंकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली. शाहू महाराज यांच्याहस्ते प्रतिमापूजन व मिरवणूकीचे उद्घाटन शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्याहस्ते झाले. त्यानंतर मिरवणूकीस प्रारंभ झाला. 

मिरवणूकीत डॉ. आंबेडकर यांचे विचार मांडणारी मोठी एलईडी स्क्रीन लावण्यात आली होती. फुलांनी सजविलेल्या बग्गीत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा मिरवणूकीचे आकर्षण होता. सातारा येथील बँड पथकाच्या भीमगीतावर ताल धरत भीमसैनिकांनी जल्लोष केला. पांढर्‍या साड्या व निळे फेटे परिधान केलेल्या माता-भगिनी लक्ष वेधून घेत होत्या. महापुरुषांचे विचार सांगणारे फलक मिरवणूकीत लावण्यात आले होते. आकर्षक विद्युत रोषणाई व लेझर शो ने मिरवणूक मार्ग उजळून निघाला होता. मिरवणूकीत महिला, लहान मुलांचा सहभाग लक्षणीय होता. 

दसरा चौक, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाव्दार रोड, पापाची तिकटी, महानगर, शनिवार पेठ, सोन्या मारुती चौक, बुधवार पेठ तालिम मंडळ मार्गे सिध्दार्थनगर येथे रात्री उशिरा मिरवणूकीचा समारोप झाला. मिरवणूकीत मंडळाचे अध्यक्ष शैलेंद्र हाबळे, उपाध्यक्ष सचिन पन्हाळकर, संदीप जिरगे, संजय पन्हाळकर, बौध्द चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकारी सहभागी झाले होते.

दरम्यान, सदर बझार, विचारे माळ, वारे वसाहत, जोशीनगर मंडळाच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूका काढण्यात आल्या.  

बिंदू चौकातील विद्युत रोषणाई बनली सेल्फी पॉईंटमाजी खासदार एस.के. डिगे फौंडेशनतर्फे बिंदू चौकात आकर्षक विद्युत रोषणाई करुन महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. फौंडेशनचे अध्यक्ष सदानंद डिगे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. बिंदू चौकातील विद्युत रोषणाईची कमान या परिसरात सेल्फी पॉईट बनला आहे. आंबेडकर अनुयायांनी या ऐतिहासिक चौकात आंबेडकर अभिवादनासह सेल्फी काढुन जयंतीचे साक्षीदार असण्याचे फोटोसेशन केले. 

'भाकप'तर्फे 14 तास वाचन उपक्रम

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने बिंदू चौक येथील कार्यालयात सलग 14 तास वाचन करुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले. उपक्रमात कॉ. अनिल चव्हाण, रमेश वडणगेकर, सुनिता अमृतसागर, प्रशांत आंबी, आरती रेडेकर आदी सहभागी झाले होते.

दुचाकी रॅलीतून सर्वधर्म समभावाचे दर्शन

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त श्री फिरंगाई तरुण मंडळ, न्यू गणेश तरुण मंडळ, फिरंगाई तालीम मंडळाच्यावतीने शहरातील विविध मार्गावरुन भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. निवृत्ती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज व बिंदू चौक येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. मिरवणूकीत निळे, भगवे ध्वज घेऊन सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी सर्वधर्मसमभावाचे दर्शन घडविले. मिरवणूकीत अजय इंगवले, पी.जी.कदम, दुर्गेश ढाले, अरविंद थोरात, राजू समर्थ सहभागी झाले होते. 


घोषणा अन् अमाप उत्साह

मिरवणुकीत निळे फेटे, जयभीम लिहिलेल्या टोप्या व ध्वज घेतलेले पुरुष, महिला, तरुणांनी डॉ. आंबेडकर यांच्या जयघोषाने शहर परिसर दणाणून सोडला होता. काही तरुणांनी डॉ. आंबेडकर यांचे टॅटू अंगावर काढले होते. सेल्फी काढून सोशल मीडियावर अपलोड करण्यात तरुणाई दंग होती.

 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news