सातारा : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असून कोरोनाचा डेल्टा व्हेरियंट कुठेही आढळून आलेला नाही. महाबळेश्वर येथे वटवाघळामध्ये निपाह विषाणू आढळला आहे. एनआयव्हीकडून त्याबाबत संशोधन सुरु असून राज्य शासनाकडून अद्याप कोणतेही निर्देश आलेले नाहीत. निपाह विषाणू वटवाघळातून माणसात प्रवेश करण्याची शक्यता खूप कमी असते. त्यामुळे जिल्हावासियांनी निपाह विषाणूला घाबरु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पत्रकार परिषदेत केले.
या आठवड्याचा संसर्ग दर विचारात घेवून उपलब्ध डेटानुसार जिल्ह्याचा स्तर ठरवला जाणार आहे. बाजारपेठांमध्ये लोकांची वर्दळ वाढणार आहे. कोरोनाच्या तिसर्या लाटेची शक्यता आहे. यामध्ये कोरोना संसर्गाला वाव किती राहिल किंवा प्रमाण कसे असेल महित नसले तरी प्रत्येकाची जबाबदारी आता वाढली असल्याचे शेखर सिंह म्हणाले.
शेखर सिंह पुढे म्हणाले, सध्या ऑक्सिजन बेड, आयसीयूची बेडची मागणी कमी झाली आहे. मागील आठवड्यातील पब्लिकल डिपार्टमेंटच्या डेटानुसार व्यापलेले बेड 37 टक्के होते आणि कोरोना संसर्ग दर 8 टक्क्यांवर होता. जिल्ह्यात सरासरी 10 हजार 500 ते 11 हजार इतके टेस्टिंगचे प्रमाण आहे. टेस्टिंग वाढवूनही बाधितांचे प्रमाण कमी असल्याचे दिसते. तरीही प्रत्येकाने काळजी घ्यावी.
शेखर सिंह म्हणाले, निपाहसंदर्भात कोणताही अहवाल जिल्हा प्रशासनाकडे आलेला नाही. सर्वच वटवाघळांमध्ये निपाह विषाणू आढळत नाही. 2 टक्के वटवाघळांमध्ये हा विषाणू असतो. त्यापैकी 1 टक्के वटवाघळातून माणसांमध्ये संसर्ग होवू शकतो पण त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. सिलीगुडीनंतर पश्चिम बंगाल, केरळमध्ये हा विषाणू आला. एनआयव्ही, आयसीएमआर किंवा भारत सरकारचा तो संशोधन व अभ्यासाचा विषय आहे. त्यांनी केलेल्या संशोधनातही वटवाघळाचे तीन प्रकार दिले आहेत. एका प्रकारच्या वटवाघळामध्ये सापडणारा निपाह आता दुसर्या प्रकारच्या वटवाघळातही सापडत आहे. म्हणून घाबरुन जाण्याचे काही कारण नाही. निपाह विषाणूचा माणसांना संसर्ग झाल्याचा कुठलाही प्रकार सातारा जिल्ह्यात समोर आलेला नाही. तरीही झाडावरुन जमिनीवर पडलेली फळे लोकांनी खाऊ नयेत. वटवाघूळ राहतात ती ठिकाणे टाळायला हवीत. वटवाघळे ही प्रत्येक जिल्ह्यात आहेत. एनआयव्हीचे संशोधन सुरु आहे. शासनाकडून यासंदर्भात काही सुचना आल्या नसल्याचेही त्यांनी सांगितले.
डेल्टा व्हेरियंटचा कोणताही रुग्ण जिल्ह्यात नाही. सिंधूदुर्ग, रत्नागिरी, पालघर, नवी मुंबई आणि जळगाव येथे हा व्हेरियंट सापडला आहे. या व्हेरियंटच्या तपासणीसाठी जिल्ह्यातील काही नमुने पाठवण्यात आले होते. मात्र शासनाकडून अद्याप त्यासंदर्भात काही सुचना आल्या नसल्याचे जिल्हाधिकार्यांनी सांगितले.
म्यूकर मायकोसिससंदर्भात विचारले असता शेखर सिंह म्हणाले, जिल्ह्यात या आजाराची 143 जणांना लागण झाली. त्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला. 54 जणांवर उपचार सुरु आहेत. म्यूकर मायकोसिससाठी शासनाने सिव्हील हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल आणि कृष्णा हॉस्पिटल ही डेडिकेट केली आहेत. त्यांचा समावेश महात्मा जोतीबा फुले आरोग्य योजनेत केला आहे. म्यूकर मायकोसिससाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये खास ओटी तयार केली जाणार आहे. मात्र यासाठी लागणार्या साहित्याच्या पुरवठ्यात अडचणी येत असल्यामुळे वेळ लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
मेडिकल कॉलेज प्रवेश प्रक्रियेसंदर्भात विचारले असता शेखर सिंह म्हणाले, कॉलेजच्या इमारतीसाठी जागा निश्चित करण्यात आली असून ती वैद्यकीय शिक्षण विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे. सिव्हील हॉस्पिटलही त्यांच्या ताब्यात देण्याचा शासन निर्णय आलेला आहे. तसेच जंबो कोविड हॉस्पिटलचा वापरही कॉलेजचा प्रिमायसेस म्हणून केला जाणार आहे. याशिवाय तात्पुरते होस्टेल, लॅब, ऑफिस, ग्रंथालय, क्लासरुमसाठी पानमळेवाडीतील गवळी कॉलेजसोबत करार झाला असून आवश्यक कामे वेगाने सुरु आहेत. पहिली बॅच ऑगस्ट-सप्टेंबरची असेल पण त्याचवेळी कोरोना लाटेची शक्यता व्यक्त होत आहे. पण शैक्षणिक वर्षाची तयारी सुरु झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोरोनाने अनाथ केलेल्या मुलांना मदतीचा हात…
जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यात 12 मुलांच्या आई वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. काही ठिकाणी एका पालकाचा कोविडमुळे तर दुसर्याचा नॉन कोविडमुळे मृत्यू झाला आहे. महिला व बालकल्याण विभागाच्या अहवालानुसार संबंधित मुलांना प्रॉपर्टी राईट्स, लीगल राईट्स मिळवून दिले जाणार आहेत. याशिवाय कोरोनामुळे आई-वडिल गमावलेल्या मुलांना 5 लाख रुपये शासनाकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे. आई-वडिलांपैकी एकाचा मृत्यू झालेली जिल्ह्यात 552 मुले असून त्यांना 1 हजार 100 रुपये बालसंगोपनाचे दिले जाणार आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांना केंद्र शासनाच्या योजनेत सहभागी करुन घेत आहोत. जिल्ह्यातील 284 व्यक्तींना राज्य व केंद्रांच्या योजनांचा लाभ दिला जाणार आहे. कोरोना काळात कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाल्यास 20 हजाराचे अनुदान दिले जाणार आहे.
'निपाह'ची लक्षणे कोणती?
* संसर्ग झालेल्या माणसाच्या व प्राण्याच्या संपर्कातआल्यामुळे थेट मेंदूवर हल्ला करतो.
* मेंदूत ताप, थकवा, बेशुद्धावस्था अशी लक्षणे.
* सुरुवातीला 7-10 दिवस ताप, थकवा, शुद्ध हरपणे, चक्कर येणे, उलट्या होणे, मळमळणे, अस्वस्थ वाटणे.
* तत्काळ उपचार न घेतल्यास पुढील 24-48 तासांमध्ये संबंधित व्यक्ती कोमामध्ये जाण्याची शक्यता.