प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्या दिवसाची वाट पाहावी लागत नाही. कारण प्रेम व्यक्त करण्यासाठी चेहर्यावरची लाली देखील पुरेशी असते. तिच्या किंवा त्याच्या चेहर्यावरचे हसू, नजरेचा एक कटाक्ष प्रेमाची कबूली देण्यासाठी पुरेसा असतो. पण काळाने रुपडे पालटले त्याप्रमाणे प्रेम व्यक्त करण्याच्या कन्सेप्ट बदलल्या असे म्हटले तरी वावगे वाटायला नको. हॅशटॅगच्या जगात भावना व्यक्त करायला नानाविविध 'डे' संस्कृती आली आहे. धावपळीच्या दुनियेत व्यक्त होण्यासाठी हे 'डे' मदत करतात. नेहमीप्रमाणे फेब्रुवारी महिना आला की तरुण तरुणींना वेध लागतात ते अशाच एका प्रेमाच्या दिवसाचे म्हणजे 'व्हॅलेंटाईन डे' चे. आज १४ फेब्रुवारी 'व्हॅलेंटाईन डे' आहे. पण हा दिवस साजरा करण्यामागे काय इतिहास आहे असा प्रश्न कधी पडला आहे का. चला तर मग जाणून घेऊया प्रेमाच्या दिवसाचा म्हणजे 'व्हॅलेंटाईन डे' चा इतिहास….
'व्हॅलेंटाइन डे' संत व्हॅलेंटाइन यांच्या बलिदानाचा दिवस
रोम राज्यात सुमारे आठशे वर्षांपूर्वी 'व्हॅलेंटाईन डे' साजरा करण्यास सुरुवात झाली होती. प्रेमाची अभिव्यक्ती करणारा हा दिवस संत व्हॅलेंटाईन यांच्या बलिदानाचा दिवस म्हणून ओळखला जातो. रोममध्ये केलेडियस द्वितीय राजाच्या साम्राज्यात रोमन सैनिकांना लग्न आणि प्रेम करण्यावर बंदी घातली होती. हा राजा प्रेम म्हणजे निव्वळ टाईमपास आहे, असे मानत होता. त्यामुळे प्रेम करणार्यांचाही त्याला राग यायचा. संत व्हॅलेंटाइनने याला विरोध करून काही सैनिकांचा विवाह लावून दिला. केलेडियसला हे समजल्यानंतर त्याने व्हॅलेंटाईनला तुरुंगात डांबले.
युअर व्हॅलेंटाइन…
तुरुंगात असतानाच व्हॅलेंटाइनचे जेलरच्या मुलीवर प्रेम बसले. प्रेम केल्याची शिक्षा म्हणून इसवी सन २६९ च्या १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन यांना फाशी देण्यात आली होती. फाशीच्या आदल्या दिवशी व्हॅलेंटाईनने प्रेयसीला पत्र लिहिले आणि पत्राचा शेवट 'युअर व्हॅलेंटाईन, तुझा चाहता' असा केला. तेव्हापासूनच १४ फेब्रुवारीला हा दिवस साजरा केला जातो, अशी आख्यायिका सांगितली जाते.
प्रत्येक दिवस प्रेम करणार्यांसाठी अपुराच असतो मात्र 'व्हॅलेंटाईन डे' साजरा करण्याचा उत्साहा काही औरच असतो.