सातारा : पुढारी वृत्तसेवा
रस्त्याच्या कामापोटी पोट ठेकेदाराकडून बिलाच्या 3 टक्के रकमेची लाच स्वीकारताना खेड (ता. सातारा) ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकार्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. 6 हजार 500 रुपयांची लाच स्वीकारल्याची माहिती समोर आल्यानंतर सातार्यात खळबळ उडाली आहे. ज्ञानेश्वर दगडू गायकवाड (वय 48, रा. शाहूनगर, सातारा) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी, या प्रकरणातील तक्रारदार हे पोट ठेकेदार आहेत. तक्रारदार यांना मुख्य ठेकेदाराकडून रस्त्याचे काम मिळाले होते. त्यानुसार केलेल्या कामाचे 3 लाख 50 हजार रुपयांचे बिल झाले होते. बिल मंजूर करून त्याबाबतचा चेक दिला होता. मात्र खेड ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर गायकवाड याने चेकच्या मोबदल्यात 3 टक्के दराने पैशाची मागणी केली.
लाचेची मागणी झाल्याने पोट ठेकेदाराने सातारा एसीबी विभागात याप्रकरणी तक्रार केली. एसीबी विभागाने तक्रार घेतल्यानंतर त्याची पडताळणी केली असता 7 हजार 500 रुपयांची लाचेची मागणी झाली. मात्र तडजोडीअंती ती रक्कम 6,500 रुपये घेण्याचे ठरले. लाचेची रक्कम मंगळवारी घेण्याचे ठरल्यानंतर एसीबीने सापळा लावला असता ग्रामविकास अधिकार्याला एसीबीने ट्रॅप केला. सातार्यात ट्रॅप झाल्याची माहिती समोर आल्यानंतर खळबळ उडाली. दरम्यान, ही कारवाई पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आरिफा मुल्ला यांनी केली.