‘अलमट्टी’च्या विसर्गाबाबत समन्वय ठेवण्याचा निर्णय

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

अलमट्टी धरणातील पाण्याचा आवश्यक विसर्ग सुरू राहावा, यासाठी समन्वय ठेवण्यात येणार आहे. त्याकरिता येत्या आठ दिवसांत कर्नाटकच्या जलसंपदामंत्र्यांशी बैठक घेतली जाईल, असे राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी सांगितले. नदीकाठांसह नाले, ओढ्यांवरील नव्याने अतिक्रमण होऊ देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील पूरनियंत्रणाबाबत कोल्हापुरात संयुक्त बैठक झाली. यानंतर पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, अलमट्टी धरणाची वरची पाणी पातळी (टॉप लेव्हल) आणि कोल्हापूर जिल्ह्यातील राजापूर बंधार्‍याची तळाची पातळी (बॉटम लेव्हल) सारखी आहे. यामुळे या पातळीपेक्षा जादा पाणीसाठा झाला, तर कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील पूरस्थिती गंभीर होते. यामुळे हे पाणी प्रवाहित राहिले पाहिजे, ते साचून राहणार नाही, याकरिता जितके पाणी राज्यातून जाते, तितक्या पाण्याचा अलमट्टीतून विसर्ग होईल, यासाठी समन्वय ठेवला जाणार आहे. समन्वय ठेवला तर पुराचा धोका कमी होईल, असेही त्यांनी सांगितले.

अलमट्टी धरणाबाबत सचिवस्तरावर बैठक झाली आहे. अधीक्षक अभियंतास्तरावरही दोन्ही राज्यांतील अधिकार्‍यांची बैठक होईल. कर्नाटकचे जलसंपदामंत्री आणि आपलीही येत्या आठ दिवसांत बैठक होईल, असे सांगत ते म्हणाले,  कोल्हापूर, सांगली, सातार्‍याची पूरस्थिती गंभीर झाली, तर किमान सात ते आठ हजार कोटी रुपयांचे नुकसान होते. यामुळे अलमट्टीच्या विसर्गाबाबत सतत समन्वय ठेवला जाईल. कर्नाटकनेही गेल्यावर्षी 5 लाख क्युसेक्सपर्यंत विसर्ग सुरू ठेवला, त्यामुळे त्यांच्या गावांचेही नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.

वडनेरे समितीचा अहवाल राज्य सरकारने पूर्ण स्वीकारला का, याबाबत उत्तर देण्याचे टाळत ते म्हणाले, या समितीने दिलेल्या अहवालात नदीकाठांवर, ओढे, नाल्यांवर अतिक्रमण झाल्याचे म्हटले आहे. काही ठिकाणी आता मोठ्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. मात्र, यापुढे अशी कोणत्याही प्रकारची नवी अतिक्रमणे होऊ देणार नाही, तशा सूचना अधिकार्‍यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सध्याची जी अतिक्रमणे गंभीर आहेत, तीही गांभीर्याने घेतली जातील, असा इशाराही त्यांनी दिला.

'रिस्क' घेऊन धरणांतील पाणी टप्प्याटप्प्याने सोडले जाणार आहे, असे सांगत ते म्हणाले, पावसाचा अंदाज घेऊन धरणांतील पाणीसाठा किती ठेवायचा, याचे नियोजन कोल्हापूर जिल्ह्याने केले आहे, त्याच पद्धतीने ते सांगली, सातारा जिल्ह्यांसाठीही करण्याबाबत सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. या तिन्ही जिल्ह्यांतील पूरस्थितीचे गावनिहाय नकाशे तयार करण्यात आले आहेत. त्यानुसार पाणी पातळी किती झाली की, कोणत्या गावातील कोणत्या ठिकाणी, किती पाणी येणार, हे त्यावर नमूद केेले आहे. या नकाशांचे वाचन कसे करायचे, त्यानंतर त्यांची अंमलबजावणी कशी करायची, याबाबत स्थानिक पातळीवर प्रशिक्षण दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. धरण क्षेत्रात पडणारा पाऊस, त्यामुळे वाढत जाणारी पाणी पातळी याची 24 ते 48 तासांची माहिती कळणार आहे. तशी यंत्रणा कार्यान्वित केल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, सातार्‍याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, जिल्हाधिकारी दौलत देसाई उपस्थित होते.

दै. 'पुढारी'चा सातत्याने पाठपुरावा

अलमट्टी धरणातील पाणीसाठा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील महापुराला कारणीभूत ठरत असल्याची अभ्यासपूर्ण भूमिका दै. 'पुढारी' सातत्याने मांडत आला आहे. या विषयावर मालिका प्रसिद्ध करून वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली आहे. आजच्या बैठकीतही अलमट्टी धरणाच्या पाणी पातळीवर चर्चा झाली.  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news