देवगड-निपाणी राज्यमार्ग दुतर्फा धोकादायक झाडी  

जामसंडे : वार्ताहर

देवगड-निपाणी राज्यमार्गावर जामसंडे येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला  वाढलेल्या झाडीमुळे वाहनचालकांना व पादचार्‍यांसाठी रस्ता धोकादायक बनला आहे.  रस्त्याच्या एका बाजुला  टाकलेली मातीमिश्रीत खडी  आणि पावसाळ्यात पडलेले  खड्डे आणि त्यात वाढलेल्या झाडीनेे साईडपट्टीच गायब झाली आहे. सा. बां. विभाग मात्र या समस्येकडे दुर्लक्ष करत आहे.

गेल्या  सात-आठ वषार्ंंपासून  पावसाळ्यात या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या शेतमळ्यात, ओहाळात, रस्त्याच्या  मोरींच्या मुखावर, गटारात  मोठ्या प्रमाणात झाडी वाढत असल्याने भातशेतीचे  नुकसान होत आहे. त्यामुळे मळ्यात  शेती  करण्यास शेतकरी धजावत नाहीत. पावसाळ्यात या झाडीमुळे ओहाळातील पाण्याचा स्तोत्र कमी होत असल्याने टाकाऊ वस्तूंसह दूषीत पाणी लगतच्या भातशेतीत शिरत असल्याने शेती नापीक बनली आहे. 

देवगडच्या  नगराध्यक्षा  सौ. साळसकर व माजी नगराध्यक्ष  श्री. चांदोस्कर  यांच्या कार्यकालात  रस्त्याच्या दोन्ही  बाजूंनी वाढलेली झाडे तोडण्यात आली होती. तसेच पाण्याची गटारे,ओहाळात साचलेली  माती  काढून हा परिसर स्वच्छ करण्यात आला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पावसाळ्यात वाढणारी झाडी शेतकर्‍यांसह शहरवासीयांना डोकेदुखी ठरत आहे. देवगड न.पं. स्वच्छ व  सुंदर   शहराचे  स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी ठोस उपाययोजना करावी,अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. 

जामसंडे शहरानजीक दोन तळी आहेत.या  तळ्यांचे  सुशोभीकरण झाल्यास शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. तसेच ही तळी बंदिस्त केल्यास पावसाचे   पाणी  वाया जाणार नाही. ते पाणी बारमाही भातशेती व गुरांना पिण्यासाठी वापरता येईल. 'पाणी अडवा पाणी जिरवा', 'गाव तेथे तळे ' ही शासनाची योजना सध्या कागदावरच आहे. ती सत्यात कधी उतरणार? हा प्रश्‍न आ वासून उभा आहे. जामसंडे शहराच्या विस्तारीकरणाबरोबरच  नागरीवस्तीही वाढत आहे. त्यामुळे  पाण्याची समस्याही दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. शहराच्या विकासाकडे लोकप्रतिनिधीनी  लक्ष देणे गरजेचे आहे. 

 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news