उत्तूरचे कोव्हिड केअर सेंटर जीवनदायी ठरेल : नविद मुश्रीफ
उत्तूर : पुढारी वृत्तसेवा
नामदार हसन मुश्रीफ फाऊंडेशन व उत्तूरकरांच्या सहयोगातून साकारलेले उत्तूर येथील कोव्हिड केअर सेंटर जीवनदायी ठरेल, असा विश्वास गोकुळ संघाचे संचालक नविद मुश्रीफ यांनी व्यक्त केला. उत्तूर येथील उत्तूर-गारगोटी रस्त्यावरील न्यू कृष्णा व्हॅली स्कूल कोव्हिड केअर सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी संपत खिलारी होते.
स्वागत व प्रास्ताविक काशिनाथ तेली यांनी केले. यावेळी सेंटरसाठी पाच ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर मशिन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना प्रांताधिकारी संपत खिलारी यांनी योग्य व सुसज्ज कोव्हिड सेंटर उभे केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. कोव्हिड सेंटर सुरू करणे सोपे; मात्र चालवणे अवघड असते. आपण सर्वांनी समाजसेवावृत्तीने हे काम पुढे नेण्यासाठी एकत्रितपणे काम करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. वसंतराव धुरे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी डॉ. सागर इंगळे, डॉ. सचिन धुरे, डॉ. भाट, डॉ. प्रकाश तौकरी, प्रा. सुरेश धुरे, संभाजी चव्हाण यांचा या कोव्हिड सेंटरसाठी केलेल्या विशेष मदतीकरिता मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच वैशाली आपटे, शिरीष देसाई, दीपक देसाई आदी उपस्थित होते. शिरीष देसाई यांनी आभार मानले.
