गडकिल्ले संवर्धन : मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती

Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील गडकिल्ल्यांचे जतन व संवर्धनासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.हा संकल्प पूर्ण करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे समितीचे उपाध्यक्ष असून समितीमध्ये एकूण 24 सदस्यांचा समावेश आहे.

गडकिल्ले संवर्धनाकरिता मुख्यमंत्री ठाकरे यांनी 16 मे रोजी दुर्गप्रेमी प्रतिनिधींसमवेत एक बैठक आयोजिली होती. संवर्धन करताना गडकिल्ल्यांचे पावित्र्य जपा, ऐतिहासिक वारशाला धक्का न लावता गडकिल्ल्यांचे जतन व संवर्धन करा, तसेच किल्ल्यासभोवतालच्या परिसरात पर्यटकांसाठी सुविधा पुरवा,आदी सूचना केल्या होत्या. या कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी सुकाणू समिती स्थापन करण्यात आली असून मिलिंद गुणाजी, ऋषिकेश यादव, माधव फडके, उमेश झिरपे, नितीन बानुगडे पाटील हे समितीत आमंत्रित सदस्य आहेत.

राज्यातील गडकिल्ल्यांच्या विकासासाठी ही समिती अग्रक्रम ठरवेल. निवड करण्यात आलेल्या किल्ल्यांचे जतन आणि संवर्धनाचे कामकाज सांस्कृतिक कार्य विभागामार्फत करण्यात येईल. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विविध सुविधा उपलब्ध करणे व परिसरात पर्यटन केंद्र उभारणे याबाबत कार्यवाही पर्यटन उपविभागामार्फत करण्यात येईल. जैवविविधता जपत गडकिल्ले परिसराचे हरितीकरण करण्याची कार्यवाही वन विभागामार्फत केली जाईल. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पोहोच रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येतील.

गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावात पर्यटन केंद्र विकसित करणे, मूळ गडाची प्रतिकृती तयार करणे, पूर्वीचे ऐतिहासिक वातावरण निर्माण करणे, लाईट अँड साऊंड शो दाखविणे, याबाबत आराखडा तयार केला जाणार आहे. गडकिल्ल्यांच्या परिसरात हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बिया टाकून नैसर्गिकरित्या या भागात वनराई विकसित केली जाणार आहे.

1

 या योजनेंतर्गत चालू आर्थिक वर्षात पहिल्या टप्प्यात शिवनेरी, राजगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, सुधागड आणि, तोरणा या सहा किल्ल्यांचे संवर्धन केले जाणार आहे. गडकिल्ल्यांचे जतन आणि संवर्धनाचे काम, त्यांचे पावित्र्य जपत, त्यांचा ऐतिहासिक वारसा आणि पुरातत्व वारसाला कोणताही धक्का लागणार नाही, याची खबरदारी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ही समिती घेईल. 

2

  या गडकिल्ल्यांच्या आजूबाजूला असलेल्या 50 कि.मी. अंतरावर असलेली पर्यटनस्थळे, साहसी खेळ, गिर्यारोहण, किल्ल्यांचे ऐतिहासिक संदर्भ, तिथे घडलेला पराक्रम, तिथले वन्यजीव, तिथली वनसंपदा, जैवविविधता जोपासत आजुबाजुची लोकपरंपरा, गडाच्या अनुषंगाने काही लढाया झाल्या असतील तर त्या, या सगळ्या गोष्टींची माहिती संकलित केली जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news