कारदगा : प्रशांत कांबळे
माणसातील विकार, द्वेष, तिरस्कार, भेदभाव यांना दूर करणारे साहित्य निर्माण झाले पाहिजे. साहित्य हे मानवाला गुलाम बनविणारे नसावे. आजच्या पिढीला कोणते साहित्य द्यावे, याबाबत चिकित्सा निर्माण व्हावी. विवेक व चिकित्सा गहाण न ठेवता साहित्यिकांनी चांगले व परिवर्तन साहित्य निर्माण केले पाहिजे. साहित्याच्या स्पर्शाने माणूस अधिक उंच व समृद्ध होतो, असे प्रतिपादन डॉ. आ. ह. साळुंखे यांनी केले. कारदगा येथील साहित्य विकास मंडळातर्फे आयोजित 24 व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.
साळुंखे पुढे म्हणाले, ग्रामीण भागात असलेल्या शिल्प, ओव्या, नाणी, वास्तू, पुराण, वस्तू, नृत्य, कला, संगीत, नाट्य, वादन याचे प्रतिबिंब ग्रामीण साहित्यात उमटले पाहिजे. साहित्य हे वाचकांची डोकी बिघडविणारे नसावे. माणसा-माणसात द्वेष व दंश करण्याचे साहित्य परिवर्तन घडविणार नाही. माणसाला पशुपासून वेगळे करणारे साहित्य असले पाहिजे. साहित्यातून भाषा समृद्ध होते. म्हणूनच भाषेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ग्रामीण भाषेचे संवर्धन झाले पाहिजे.
वेदकालिन साहित्य वेगळे नव्हते. त्यामध्ये निसर्ग, मानवी नाती याचे हुबेहूब चित्रण मांडले आहे. साहित्य हे भेदभाव निर्माण करणारे नसावे. शेतकर्यांच्या व्यथा, अस्मिता, स्वत्व, अडचणी, सुख-दुःख मांडण्यासाठी ग्रामीण साहित्य संमेलनांची गरज आहे. शेतकर्यांच्या व्यथाचे भांडवल होता काम नाही. मातीशी गद्दारी केली जातेय. गावंढळ म्हणून आज ग्रामीण युवकाला हिणवले जाते. त्यासाठी ग्रामीण युवकांनी भाषा, व्यक्तिमत्त्व, शुद्धता व आपल्यामध्ये न्यूनगंड निर्माण होऊ देवू नये. येणार्या पिढीने भाषा अधिक समृद्ध केली पाहिजे. बोली भाषेचा आदर झाला पाहिजे.
मुलांनी अभ्यासासह व्यवहार भाषा व बोलीभाषेकडे अभिमानाने पहावे. बोली भाषेतील शब्द, वाक्यप्रचार, म्हणी हे प्रमाण भाषेत गेले पाहिजेत. स्थानिक समस्यांचे चित्रण ग्रामीण साहित्यामध्ये आले पाहिजे. कर्नाटकातील बदामी येथील गुहेत नटराजच्या 81 मुद्रा असून हे देखील साहित्य आहे. काव्य व साहित्याला विषयांची मर्यादा नाही. त्यांचे ऋणानुबंध अधिक आहे.ग्रामीण भागाला मराठीची अभिरुची आणि मुलांना उत्तम इंग्रजीही आले पाहिजे.
जागतिकीकरणामुळे अनेक तोटे निर्माण होण्याबरोबरच संधीही निर्माण केल्या आहेत. मुलांकडे कौशल्य असावे. समाजाला देण्यासाठी कौशल्य हेच महत्त्वाचे असते. साहित्य व शब्दामुळे मानवी जीवन अधिक सुंदर, लावण्यमय, सुखी आणि आनंदी बनते. आपले साहित्य सुंदर करता येत नसल्यास कुरूप व विकारग्रस्त होणार नाही, याची खबरदारी साहित्यिकांनी घेतली पाहिजे. शहरातील साहित्यिकांचे डोळे उघडतील, असे ग्रामीण साहित्यातून साहित्य निर्माण झाले पाहिजे. आजचा माणूस जीव असूनही नसल्यासारखा आहे. समाजातील वाईट लोकांची पर्वा न करता आपले साहित्य लिहावे. भाषा, साहित्य, वाचन, संवाद, वस्तुसंग्रहालय, स्थानिक कला यातून साहित्य अधिक समृद्ध बनत असल्याचे सांगितले.
सी. बी. कोरे म्हणाले, साहित्य संमेलनाची सुरुवात गोंविद रानडे यांनी सन 1878 मध्ये केली. आज साहित्य समेलनाचा डंका दूरवर पसरला आहे. दीपाप्रमाणे कारदगा येथील हे संमेलन तेवत राहील. प्रसंगसागर महाराज म्हणाले, जीवनात एक चांगली व्यक्ती बनण्यासाठी सत्कर्म करणे गरजेचे आहे. ग्रंथ, धर्म व साहित्याने एक चांगला नागरिक बनण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. एकता व प्रेमामुळे मानवी जीवन सुखमय होईल. संमेलन व जंगली महाराज मठामुळे गावचे नाव दूरवर पसरले आहे. मुलांवर चांगल्या संस्काराची गरज आहे. त्यासाठी कुटुंबानेही सुसंस्कृत असावे. यावेळी अच्युत माने, एन. के. प्रताप, श्रेणीक पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी स्वागताध्यक्षा नंदिनी हेगडे यांनी स्वागत केले. साहित्य विकास मंडळाचे अध्यक्ष प्रकाश काशिद यांनी प्रास्ताविकात मंडळाच्या कार्याचा आढावा घेतला. सुचित बुडके यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. दत्त सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्रेणिक पाटील यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन, अॅड. सी. बी. कोरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, जवाहरचे संचालक बाबासाहेब नोरजे यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजन, एन. के. प्रताप यांच्या हस्ते डॉ. गिरीश कर्नाड व्यासपीठाचे उद्घाटन झाले. साहित्य संमेलनासाठी मुनीश्री प्रसंगसागर महाराज उपस्थित होते.
संमेलनात शिक्षक संजय बुडके यांचे नवोदय किंग हे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शिका पुस्तक, अनूप जत्राटकर यांचे निष्पर्ण पिंपळाच्या छायेत हा एकांकिका संग्रह, जयकुमार मालगावे यांचे सुनेचा छळ वंशाला झळ या पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. गुणवंत विद्यार्थी, प्रगतशील शेतकरी व खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात आला.
संमेलनास मंत्री शशिकला जोल्ले, माजी आ. काकासाहेब पाटील, प्रा. सुभाष जोशी, दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे, सुनीलकुमार लवटे, जि. पं. सदस्या सुमित्रा उगळे, ता. पं. सदस्य दादासाहेब नरगट्टे, आण्णासाहेब हवले, प्रदीप जाधव, नितेश खोत, डॉ. अभिनंदन मुराबट्टे, कुबेर आळते, लक्ष्मण पसारे, अभिजीत शेवाळे, अरविंद खराडे, गणी पटेल, डॉ. बी. ए. माने, रामभाऊ पाटील, दत्ता खोत यांच्यासह मान्यवर व रसिक उपस्थित होते. कल्पना रायजाधव यांनी सूत्रसंचालन केले.