पुणे : पुढारी वृत्तसेवा
मंतरवाडी, हांडेवाडी परिसरात घरफोडी करून धुमाकुळ घालणाऱ्या, यावेळी तरूणाला चाकूचा धाक दाखवून लुटणार्या शिकलकरी टोळीतील तीन सराईतांना लोणी काळभोर पोलिसांनी पाठलाग करून बेड्या ठोकल्या. यावेळी आरोपींकडून साडेसहा लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला असल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त कल्याणरावव विधाते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जयसिंग काळुसिंग जुनी (वय २८), सोमनाथ नामदेव घारूळे (२४, दोघेही रा. बिराजदारनगर, वैदवाडी, हडपसर) आणि बल्लुसिंग प्रभुसिंग टाक (२४, रामटेकडी, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या तिघा सराईतांची नावे आहेत.
घरफोडी आणि चोरीच्या अनुषंगाने लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे तपास पथक अज्ञात चोरट्यांचा शोध घेत असताना तपास पथकातील पोलिस अमंलदार अमित साळुंके, बाजीराव वीर, निखील पवार असे उरूळी देवाची, हांडेवाडी परिसरात गस्त घालत होते. यावेळी दोन व्यक्ती संशयीतरित्या फिरत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार अमित साळुंके यांनी वरीष्ठांना माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी तपास पथकातील सहायक पोलिस निरीक्षक राजु महानोर व पोलिस अमंलदारांना कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या.
अधिक वाचा : तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचे निधन
त्यानुसार तपास पथक हांडेवाडी येथे गस्त घालत असताना त्यांना दोघेजण दुचाकीवरून संशयीतरित्या जाताना दिसले. त्यांना तपास पथकाने थांबविण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी न थांबता पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. यावेळी पळून जाण्याच्या तयारीत असताना पथकाने त्यांना पाठलाग करून पकडले. यावेळी आरोपींनी पोलिस पथकावर दगडफेकही केली. यावेळी जयसिंग जुनी आणि सोमनाथ घारूळे या दोघांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.
त्यांच्याकडील तपासात बल्लुसिंग टाक याला ताब्यात घेण्यात आले. तिन्ही आरोपींकडून यावेळी ७३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, एक एलईडी टिव्ही, एक डिव्हीआर, दोन मोबाईल, एक सॅन्ट्रो कार, एक दुचाकी असा साडेसहा लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. पोलिस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलिस आयुक्त कल्याणराव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, गुन्हे निरीक्षक सुभाष काळे, तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक राजु महानोर, पोलिस अमंलदार नितीन गायकवाड, गणेश सातपुते, अमित साळुंके, श्रीकांत जाधव, सुनिल नागलोत, निखील पवार, शैलेश कुदळे, बाजीराव वीर, दिगंबर साळुके यांच्या पथकाने ही कारवाई केली.
तिघा आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करएण्यात आले असता, त्यांना दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनाविण्यात आली आहे. या पोलिस कोठडी दरम्यान, लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील दोन घरफोडीचे गुन्हे, एक जबरी चोरीचा तर हडपसर पोलिस ठाण्यातील चोरीचे दोन तर घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यात यश आले आहे. जयसिंगवर ११, सोमनाथ ४ तर बल्लुसिंग याच्यावर तब्बल ६३ गुन्हे दाखल आहेत.