मुंबई : पुढारी ऑनलाईन
विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर आज विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदाची देखील निवड करण्यात आली. विरोधी पक्षनेतेपदी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली. फडणवीस यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांचे अभिनंदन केले.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर केंद्रात सत्तारूढ असलेल्या भाजप पक्षाला राज्यात मात्र विरोधी बाकावर बसावे लागले आहे.
विरोधी पक्ष नेते म्हणून, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, गिरीष महाजन या भाजप नेत्यांच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली हेाती. परंतु या चर्चेला पुर्णविराम लागत आज विधानसभेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड विरोधी पक्षनेतेपदी करण्यात आली.
आज विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याची घोषणा रविवारी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सभागृहात केली. पटोले म्हणाले, "विधानसभेतील विरोधी पक्ष नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांना मान्यता देण्यात यावी अशी विनंती भाजपाने आपल्याकडे केली आहे. त्यामुळे अधिकृत विरोधी पक्ष म्हणून मी भाजपाला मान्यता देत आहे. तसेच भाजपने गटनेते देवेंद्र फडणवीस हे १ डिसेंबर २०१९ पासून विरोधी पक्ष नेते असतील असे मी जाहीर करतो."
त्यानंतर सभागृहाचे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.