भोकरदन; पुढारी वृत्तसेवा : जाफराबाद रोडवरील केळना नदीच्या पुलावर परभणी जिल्ह्यातील पोलीस आणि एटीएम फोडणाऱ्या आरोपींमध्ये पाठलाग करताना चकमक झाली आणि त्यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला आहे. आरोपी आणि पोलिसांमध्ये चकमक झाल्याची चर्चा असून भोकरदन पोलिसांकडे या संदर्भात अधिक माहिती नसल्याने सस्पेंस वाढला आहे. हा थरार बुधवारी पहाटे घडल्याची माहिती आहे.
या घटनेविषयी माहिती अशी की, बुधवारी १६ जून रोजी दुपारी साडे बारा ते एक वाजेच्या दरम्यान भोकरदन शहरातील जाफराबाद रस्त्यावरील केळना नदीवर असलेल्या पुलावर वाहतूक ठप्प झाली होती. याच दरम्यान एक कार भरधाव वेगात पुढे आली. पाठोपाठ एक जीपसुध्दा आली. या वाहनांनी पूल ओलांडला तोच एक पोलीस कर्मचारी जीपमधून उतरला आणि त्याने कारच्या दिशेने गोळी झाडली. त्यापूर्वी कारमधील एकाने पोलिसांच्या दिशेने गोळी झाडल्याची चर्चा आहे. मात्र, उपस्थित नागरिकांना गाडीचे टायर फुटले असेल अशी शंका वाटली. परंतु, पोलिसांच्या गोळीबारामुळे काहीतरी गडबड असल्याचे लक्षात येताच नागरिकांनी धावपळ केली.
परभणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस असल्याची प्राथमिक माहिती असून ते स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक परराज्यातील एटीएम फोडणाऱ्या टोळीचा पाठलाग करत असताना हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपींनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केल्यानंतर पोलिसांनी प्रतिउत्तरात गोळीबार केल्याचे समजते. याशिवाय यातील काही आरोपी भोकरदन येथे गाडीतून उतरल्याची चर्चा आहे. यासंदर्भात भोकरदनच्या पोलिस सूत्रांनी सांगितले की, नेमके प्रकरण काय आहे हे सांगता येणार नाही. मात्र, जिंतूर येथील परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी डॉ. श्रवण दत्त यांनी भोकरदन पोलिसांनी संबंधित पोलिसांना मदत करण्याचा फोन केला होता.
शहरात उलटसुलट चर्चा
भोकरदन शहरात या गोळीबाराच्या घटनेनंतर उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. कोणी गुन्हेगारांच्या टोळीचे वाटाघाटीवरून वाद झाले तर कोणी म्हणते एटीएम फोडणाऱ्या टोळीमधील हे चोरटे होते. मात्र एक नक्की या केळणा नदीवरील पुलाच्या रेंगाळलेल्या कामा मुळे परभणी पोलिसांच्या हातून अट्टल गुन्हेगार सुटल्याची चर्चा होत आहे. कारण वाहतूक जाम झाल्याने पोलिसांची गाडी अडकली आणि चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले.