

गंगापूर : पुढारी वृत्तसेवा : मुलीला पळवल्याचा आरोप करत एका ७० वर्षीय वृद्धेला विवस्त्र करून शिवीगाळ करत मारहाण करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार तालुक्यातील वझर येथे घडला. वृद्धेला मारहाण केल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आला. याप्रकरणी तिघांविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात रविवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर तालुक्यातील वझर गावाजवळ असलेल्या पारधी वस्तीवर मारहाण झालेली वृद्धा आपल्या नातवासोबत राहते. दरम्यान, ओझर गावातील विवेक उर्फ चवल्या पिंपळे, नितुबाई विवेक उर्फ चावल्या पिंपळे, भावड्या पिंपळे आपल्या साथीदारांसह पीडित वृद्ध महिलेच्या घरी गेले. तुझ्या नातवाने आमची मुलगी पळवून नेली आहे, असा आरोप करून आरोपींनी त्या वृद्ध महिलेला आपल्यासोबत वझरला घरी नेले.
वृद्धेला वझर येथील पारधी वस्तीवर आणल्यावर आरोपीने तिला मारहाण करायला सुरुवात केली. संतापजनक म्हणजे महिलेला विवस्त्र करत मारहाण करण्यात आली. यावेळी पीडित वृद्धा हात जोडून दयेची भीक मागत होती. मात्र, आरोपींना दया आली नाही. आरोपींनी त्या वृद्धेला मारहाण करतानाचा व्हिडिओ तयार करून समाज माध्यमांवर व्हायरल केला. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात वृद्धेने फिर्याद दाखल केली. त्यानुसार आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर, सपोनि. अशोक चौरे, पोलीस उपनिरीक्षक दीपक औटे करीत आहेत.
हेही वाचलंत का ?