आम्हा घरी धन शब्दांचीच रत्न..!

Published on
Updated on

संतांनी मराठी भाषेत अनेक रचना केल्या. भाषेचं सामर्थ्य म्हणजे शब्दांचं सामर्थ्य हे त्यांना किती माहिती होतं. संत तुकाराम महाराजांचा एक फार चांगला अभंग आहे,

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने

शब्दांचीच शस्त्रे यत्न करू….

शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन

शब्द वाटू धन, जन लोका…

तुका म्हणे पाहा शब्दचि हा देव

शब्देंचि गौरव पूजा करू…

आमच्याकडे शब्दांचंच धन आहे. आमच्याकडे शब्दांचे शस्त्र आहे. शब्दांसाठी आम्ही लढतो. याचा अनेक वेळा आपल्याला प्रत्यय आलेला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत जे लोक अग्रभागी होते, ते शब्दांचा वापर करणारे लोक होते. आचार्य प्र. के. अत्रे याचं व्याख्यान शब्दांचा एक प्रकारचा उत्सव असे. दैनिक 'मराठा'मधून आलेल्या त्यांच्या अग्रलेखातून त्यांनी सगळा महाराष्ट्र हलवला. 

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अनेक वर्तमानपत्रे त्या काळात होती. त्यांनी शब्द हत्यार म्हणून वापरले. ज्या प्रकारे स्वातंत्र्यलढ्यात लोकमान्य टिळकांचा लेखनाचा एक बाज होता. ते शक्य होईल तो ब्रिटिश कायद्याच्या चौकटीत राहून कायद्याच्या कचाट्यात न सापडता लिहायचे. वेगळ्या प्रकारची मराठी त्यांनी घडवली. शिवरामपंत परांजपे यांनी तर 'काळ' नावाचं वर्तमानपत्र चालवलं होतं. उपहास करणं तसेच त्यांचं उपरोधिक बोलणं होतं. परंतु; ते बरोबर लोकांपर्यंत पोहोचायचं. कारण, त्या वेळेला जर कोणी सरळ आणि स्पष्ट बोललं तर त्याच्यावरती खटला भरला जायचा, त्याला शिक्षा व्हायची. शिवरामपंतांनी त्याच पद्धतीने लेखणीचं हत्यार तयार केलं.

काही लोक सरळ- सरळ स्वच्छ बोलणारे होते. कशाचीही पर्वा करीत नव्हते. ब्राह्मणेतर चळवळीतील दिनकरराव जवळकर होते. ते तर अत्यंत जहाल लिखाण करायचे. या सगळ्या प्रकारच्या हत्यारांचा उपयोग मराठी माणसांनी ब्रिटिश काळात केला. नंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये केला. शब्दही शस्त्र होऊ शकतात. शब्द हे धन आहे. देवाची भक्ती करायची असेल तर याच शब्दांनी करू आणि शब्दांची उपासनासुद्धा शब्दांनी करू. ही जी भाषा आहे, ती मराठी भाषा आहे. 

हे पहिल्यांदा संत ज्ञानेश्वर महाराजांनीच सांगितले. त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली ती मराठी माणसाला संस्कृतमध्ये असलेलं भगवद्गीतेतलं अध्यात्म सांगितलं पाहिजे आणि लोकांना ते कळलं पाहिजे यासाठी आणि लोकांना ती रुक्ष वाटू नये असे त्यांना वाटले. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांचे गुरू निवृत्तीनाथांना प्रार्थना केली. ज्ञानेश्वरी लिहिता-लिहिता 12 व्या अध्यायामध्ये नमन केलं आणि मागितलं, 'इये मराठीचिये नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, देणे-घेणे सुखचि वरी, होऊ देई या जगा…' माझी मराठीच एक नगरी आहे आणि त्या नगरीमध्ये ब्रह्मविद्येचा सुकाळ असला पाहिजे. ती सगळ्यांसाठी खुली पाहिजे. कोणी परत जाता कामा नये. हा जो देण्या-घेण्याचा व्यवहार असतो, तो या लोकांना अध्यात्म विद्या देता आली पाहिजे, घेता आली पाहिजे, हे तू कर…असं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले.

अध्यात्म विद्या सांगताना आणखी काय काय आलं पाहिजे तर

साहित्य सोनियाचिया खाणी । 

उघडवी देशियेच्या अक्षोणी ॥

यात मराठी ही जमीन आहे. त्यात साहित्यरूपी सोन्याच्या खाणी उगवू देत.

विवेकवल्लीची लावणी हो देई सैंघ॥

येथे संपूर्ण रससिद्धांत आहे. अभिनव गुप्त नावाच्या काश्मिरी पंडिताने नंतरच्या काळात विकसित केलेला आणि भरतमुनींनी तो नाटकाच्या बाबतीत पहिल्यांदा मानला. भरत मुनींच्या नाट्यशास्त्रावरती भाष्य करताना त्या सिद्धांताची अभिनव गुप्तांनी त्याची व्याप्ती वाढवली. ज्ञानेश्वर महाराज इकडे मराठीत त्याचे महत्त्व सांगताहेत. अष्टरस मुख्य आहे. पूर्वीच्या नाट्यशास्त्रामध्ये नंतर नवव्या रसाची भर पडली तो म्हणजे, शांतरस. शांतरसाला महारस म्हणतात. हा शांतरससुद्धा मराठीमध्ये निर्माण होऊ देत, म्हणजे बाकीचे रस वर्ज्य आहेत असे नाही.

नवरसी भरवी सागरू। करवी उचित रत्नांचे आगरू… या भाषेमध्ये उत्तम साहित्याची निर्मिती झाली पाहिजे, उत्तम दर्जाचे तत्त्वज्ञान निर्माण झाले पाहिजे, कुठलाही विषय पेलण्यासाठी भाषा सक्षम झाली पाहिजे, हे सूत्र होतं. अशी भाषा त्यांनी घडवली.

मी भाषा सल्लागार समितीचा अध्यक्ष होतो. आणि असं ठरलं की, भाषा सल्लागार समितीने सरकारला अहवाल द्यायचा. पुढील पंधरा ते वीस वर्षे महाराष्ट्र राज्याचे भाषिक धोरण कसे असले पाहिजे, असा अहवाल तयार करायचा होता. त्याप्रमाणे आम्ही तो तयार केला. बरीच मेहनत करावी लागली, चर्चा करावी लागली. त्याची सुरुवात मराठी भाषेचा जाहीरनामा पहिल्यांदा ज्ञानेश्वर महाराजांनी प्रस्तुत केला आहे. आपली भाषा कशी असली पाहिजे, याचा ज्ञानेश्वर महाराजांनी उल्लेख केलेला आहे. तर हे ज्ञानेश्वर महाराजांना अपेक्षित होतं की, आपण त्यांचे वारसदार आहोत. भाषेच्या बाबतीत म्हटल्यानंतर तर आपल्या भाषेला पुढे कसं नेऊ असं धोरण असलं पाहिजे, असं त्यातून अभिप्रेत असल्याचे आम्ही दाखवलं. तो अहवाल आम्ही पुढे पाठवला.

जर आपल्याला मराठी भाषेचा जाहीरनामा काढायचा असेल तर ज्ञानेश्वर महाराजांनी तो जाहीरनामा १३ व्या शतकापूर्वी काढलेला आहे. म्हणून आपण भाग्यवान आहोत की, आपल्याला खूप मोठी परंपरा, वारसा हक्क लाभलेला आहे. फक्त त्याचा उपयोग कसा करायचा, ते आपल्याला समजलं पाहिजे.

ही मराठी भाषा अशाप्रकारे संतांनी विकसित केली. या भाषेत प्रचंड क्षमता आहे. माणूस हा प्राण्यांपेक्षा वेगळा कशामुळे झाला, तर तो भाषेमुळे झालेला आहे. माणसाकडे भाषा आहे. तो भाषेतून वेगवेगळ्या सृष्टी निर्माण करू शकतो; जी प्राण्यांना करता येत नाही. भाषेच्या माध्यमातून एका पिढीने घेतलेले ज्ञान दुसर्‍या पिढीत जाते. माणसाकडे दोन शक्ती आहेत. एक म्हणजे हातांनी प्राप्त झालेली श्रमाची शक्ती आणि दुसरी म्हणजे भाषेची शक्ती. कार्ल मार्क्सने कामगार नावाच्या शक्तीवर भर दिला आणि चळवळ उभी केली. दुसरी शक्ती भाषा आहे. ती जास्तीत- जास्त चांगली झाली पाहिजे. मराठी चांगली करायची असेल तर तुमच्याकडे कोणती सामग्री आहे. तर संतांनी निर्माण केलेलं साहित्य ही आपली सामग्री आहे. 

हा वारसा आपण गमावता कामा नये. इंग्रजी माध्यमातल्या विद्यार्थ्यांना वाटतं की, हे सगळं कालबाह्य झालं आहे. या सगळ्या चुकीच्या समजुती आहेत. हे सगळं संतांनी निर्माण केलेलं आहे. एवढं तुमच्याकडे धन आहे त्याचा तुम्ही कसा वापर करायचा हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून संतांचा उपयोग हा फक्त मोक्ष मिळवण्यापुरता, देवाकडे जाण्यापुरता, भक्ती करण्यासाठी आहेच. भाषेमुळे तुम्ही आम्ही आहोत. तुम्ही मराठी माणसं आहात. तुमचं एक वेगळेपण आहे. तुमचं वेगळं वैशिष्ट्यं आहे. ते भाषेमुळे निर्माण झालेलं आहे. तुमच्याकडे असलेले ग्रंथ हे जगाच्या पाठीवर मान्यताप्राप्त असलेल ग्रंथ आहेत. तुकाराम महाराजांची गाथा ही मराठी माणसांचं पासपोर्ट आहे. आपली भाषिक आणि सांस्कृतिक ओळख काय आहे तर ती म्हणजे आपली तुकोबांची गाथा आहे. एवढं महत्त्व आपल्या संतांना आणि संत साहित्याला आहे. म्हणून भाषिक दृष्टीनेसुद्धा आपण याकडे नीट पाहिले पाहिजे.

-डॉ. सदानंद मोरे (लेखक साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि संत साहित्याचे अभ्यासक आहेत.)

 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news