वाशीम : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील पेडगाव (ता. रिसोड जि. वाशिम )येथील आरव मंत्री (वय १२) व त्याचे वडील शिवलाल मंत्री यांनी आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर किलीमांजारोच्या गिलमन्स पॉईंटवर भारताचा तिरंगा फडकवून इतिहास रचला. ॲडव्हेंचर कंपनी 360 एक्सप्लोरर मार्फत त्यांनी ही मोहीम पूर्ण केली आहे.
गुरुवारी (ता.७) भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी दहा वाजता या दोघांनी किलीमांजारो गिलमन्स पॉइंटवर पाऊल ठेवले. मूळचे वाशीम जिल्ह्यातील असलेले मंत्री बापलेकांनी जिल्ह्यातील प्रथमच आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक होण्याचा मान मिळवला आहे. सध्या मंत्री कुटुंब कामानिमित्त नाशिक येथे राहात आहे.
आफ्रिकेतील टांझानिया देशातील हे शिखर असून याची उंची समुद्र सपाटी पासून 19,341फूट आहे. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी 15 ऑगस्ट 2014 रोजी हे शिखर सर करून त्यावर भारताचे राष्ट्रगीत वाजवून विश्वविक्रम केला होता. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तयारी करत असलेले बालगिर्यारोहक आरव मंत्री व त्याचे वडील शिवलाल मंत्री दोघांनी हे शिखर सर केले आहे. शून्याच्या खाली तापमान, गोंगावत वाहणारे वारे, उभी चढण या सर्वांमधून अतिशय काळजीपूर्वक यांनी ही मोहीम पूर्ण केली आहे. या शिखराच्या चढाईसाठी त्यांनी 2 नोव्हेंबर रोजी सुरवात केली होती. आरव हा सातवीमध्ये शिकत असून आई शिवानी मंत्री यांची सर्वात मोठी प्रेरणा आहे असे तो म्हणतो.
साहसी पिता-पुत्र
सध्या वातावरणात झालेल्या मोठ्या बदलामुळे व वादळामुळे दररोज दुपारनंतर किलीमांजारो शिखरावर अतिशय वेगाने वारे वाहत असून बर्फवृष्टी होत आहे. सकाळी ऊन व दुपारनंतर वादळ असे भीती निर्माण करणारे वातावरण असून या सर्वाला भेदून आरव व शिवलाल या पितापुत्राने हा पराक्रम करून दाखवला आहे.
आरवची पुढील मोहीम
आरव किलीमांजारो नंतर 360 एक्स्प्लोररच्या माध्यमातून युरोप व ऑस्ट्रेलीया खंडातील सर्वोच्च शिखर सर करणार आहे.
आरव मंत्री(बालगिर्यारोहक)
शेवटच्या चढाईवेळी कमी तापमानात आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थतीत आम्ही ही चढाई पूर्ण केली आहे. भारताचा तिरंगा किलीमांजारो शिखरावर फडकवताना अभिमान वाटला. पुढे युरोप व ऑस्ट्रेलीयामधील सर्वोच्च शिखर सर करावयाचे आहे.
शिवलाल मंत्री(गिर्यारोहक)
आमच्या प्रत्येक पावलावर एक मोठे साहस होते. आफ्रिकेतील हे शिखर सर करणे माझ्या कुटुंबासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मुलगा आरव चा खूप अभिमान वाटतो. अत्यंत वाईट व बदलत्या वातावरणात आम्ही पोहचू शकलो याचा अभिमान वाटतो आहे. वाशीममधून भरभरून प्रेम व सपोर्ट मिळाल्यामुळे हे सर्व करू शकलो.
आनंद बनसोडे (एव्हरेस्टवीर )
आरव व शिवलाल मंत्री यांनी जे यश संपादन केले आहे त्याचा सर्वांना अभिमान आहे. अतिशय प्रतिकूल वातावरणात त्यांनी जी चढाई केली आहे त्याला कशाची तोड नाही. महाराष्ट्राचे एव्हरेस्ट गुरु सुरेंद्र शेळके यांचे सततचे मार्गदर्शन यामुळे अनेकांना मार्गदर्शन देऊ शकतो आहे.