अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून 526 कोटींचे कर्ज वाटप

Published on
Updated on

कोल्हापूर : सचिन टिपकुर्ले

मराठा समाजातील बेरोजगार युवक-युवतींना आर्थिक मदतीचा हात देत स्वत:चे उद्योग सुरू करण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने राज्यात आतापर्यंत 526 कोटी 71 लाख 57 हजार 282 रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. 10 हजार 311 लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेतला असून यामध्ये अहमदनगर जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. यानंतर औरंगाबाद, नाशिक, पुणे व कोल्हापूरचा क्रमांक लागतो. सर्वात कमी प्रतिसाद गडचिरोली जिल्ह्यातून मिळाला आहे.

राज्य शासनाने प्राधान्याने मराठा प्रवर्गातील व ज्यांच्याकरिता महामंडळ अस्तित्वात नाही, अशा फक्‍त महाराष्ट्रातील नागरिकांसाठी ही योजना सुरू केली. उमेदवारांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणारी राज्य शासनाची ही एकमेव योजना आहे. लाभार्थ्याचे कर्ज मंजूर झाल्यानंतर त्यावरील व्याज भरण्याची जबाबदारी ही राज्य शासन घेते. आजपर्यंत मंजूर रकमेपैकी 17 कोटी 39 लाख 38 हजार 528 रुपयांचे व्याजही शासनाने भरले आहे. त्यामुळे बँकांनाही या योजनेबाबत विश्‍वास निर्माण झाला आहे. काही ठिकाणी बँकांकडून कर्ज देण्यास टाळाटाळ होत असल्याच्या तक्रारी केल्यानंतर महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात त्याचे पडसाद उमटले. त्यानंतर या प्रकरणांच्या मंजुरींना गती मिळाली.

कृषी संलग्‍न, पारंपरिक उपक्रम तसेच लघू, मध्यम उद्योगांतर्गत उत्पादन, व्यापार, विक्री सेवा क्षेत्रासाठी या योजनेतून कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो.  पुरुषांसाठी 18 वर्षांपासून 50 वयोगटापर्यंत, तर महिलांसाठी 18 ते 55 वर्षे असा वयोगट करण्यात आला आहे. वैयक्‍तिक कर्ज व्याज परतावा योजना व गट कर्ज व्याज परतावा योजना अशा दोन विभागांतर्गत कर्ज देण्याची सोय करण्यात आली आहे. योजना सुरू झाल्यापासून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

राष्ट्रीयीकृत, राज्य व जिल्हा बँकांकडून या अर्जदारांना कर्ज उपलब्ध करून दिले जाते. आपण राहत असलेल्या भौगोलिक परिसरातील राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत कर्जाचे वितरण केले जात आहे. गेल्या तीन वर्षांत या योजनेला गती मिळाली असून मंडळाच्या स्थापनेपासून प्रथमच एवढ्य मोठ्या प्रमाणात कर्ज वितरण करण्यात आले आहे.

युवक-युवतींनी लाभ घ्यावा : पवार

नोकरीच्या मागे न लागता मराठा समाजातील युवक-युवतींनी स्वत:चा उद्योग व्यवसाय उभारण्याला प्राधान्य द्यावे. यासाठी त्यांनी योजनेचा लाभ घ्यावा. राष्ट्रीयीकृत बँकांनीही या योजनेअंतर्गत येणार्‍या प्रकल्पांना मंजुरी द्यावी, असे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार यांनी सांगितले.

वैयक्‍तिक कर्ज परतावा योजना

  राज्यातून प्राप्‍त अर्ज : 87 हजार 756

  एकूण पात्रता प्रमाणपत्र : 60 हजार 171

  वितरित केलेले कर्ज : 526 कोटी 71 लाख  57 हजार 282 रुपये

  व्याज परतावा झालेली रक्‍कम : 17 कोटी 39 लाख 38 हजार 528

लाभार्थी अव्वल पाच जिल्हे…

जिल्हा                बँक मंजूर प्रकरणे                             कर्ज वाटप

अहमदनगर              1,112                         55 कोटी 33 लाख 46 हजार 406 रुपये 

औरंगाबाद                  989                         53 कोटी 18 लाग 28 हजार 726 रुपये

 नाशिक                      958                        49 कोटी 90 लाख 23 हजार 679 रुपये

 पुणे                           845                        48 कोटी 52 लाख 28 हजार 917 रुपये

कोल्हापूर                   719                         42 कोटी 92 लाख 2 हजार 230 रुपये

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news