वरून कीर्तन, आतून तमाशा | पुढारी

Published on
Updated on

कोल्हापूर : सुनील कदम

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झालेली आहे; तर भाजप-शिवसेनेसह काही मित्रपक्षांची युती झालेली आहे. वंचित बहुजन आघाडीने स्वबळाचा नारा दिलेला आहे आणि अन्य काही छोटे-मोठे राजकीय पक्ष आणि काही अपक्षही आपापली ताकद आजमावण्यासाठी सिद्ध झालेले आहेत. पण या निवडणुकीत एक प्रमुख वैशिष्ठ्य आढळून येत आहे आणि ते म्हणजे सर्वच राजकीय पक्षांमध्ये 'वरून कीर्तन आणि आतून तमाशाचा फड रंगताना दिसत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि सेना-भाजप युतीचे काही नेते-कार्यकर्ते अनेक मतदारसंघांमध्ये एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी वेगवेगळे अंतर्गत प्रयोग करताना दिसत आहेत! त्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण असल्याचे दिसत आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीची गेल्या काही दिवसांमध्ये अशी मोठी वाताहत झाली असतानासुद्धा या दोन्ही पक्षांचे नेते मात्र विरोधकांपेक्षा आपापल्या मित्रपक्षाचीच राजकीय ताकद आजमावण्यात दंग असल्याचे दिसते. राजकीयदृष्ट्या दोन्ही पक्षांचे हाड-कातडे एक झाले असताना दोघेही परस्परांना आपापल्या दंडावरील बेटकुळ्या दाखविण्याची किंवा कुरघोडी करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. शिवाय दोन्ही पक्षांतर्गत त्यांच्या पाचवीला पुजलेली भाऊबंदकीही कायम आहेच.

आज जरी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली असली तरी या आघाडीला ठाम विश्वासाचे अधिष्ठान मात्र लाभलेले दिसत नाही. या पक्षांच्या नेते-कार्यकर्त्यांचा परस्परांवर यापूर्वी कधी विश्वास नव्हताच, तसाच तो या निवडणुकीतही नसलेलाच दिसतो. 'याला मी मदत केली तर तो त्या उपकाराची परतफेड करणार की आतल्या अंगाने विश्वासघात करणार, याचं आतून एक आणि बाहेरून एक असं तर नाही ना, राष्ट्रवादीचा भाजप-किंवा सेनेशी काही अंतर्गत समझोता झाला आहे की काय', अशा अनेक शंका-कुशंका दोन्ही पक्षाच्या नेते-कार्यकर्त्यांच्या मनात असलेल्या दिसतात. त्यामुळे जरी या दोन्ही पक्षांची आघाडी झाली असली तरी अगदी तळागाळापर्यंत नेते-कार्यकर्त्यांचं मनोमिलन होईल, तेव्हाच खरे. राज्यातील अनेक मतदारसंघांचा कानोसा घेता असे आढळून येते की, या दोन्ही पक्षांतर्गत सुरू असलेल्या कुरघोड्या अजूनही थांबलेल्या नाहीत.

तशातच दोन्ही पक्षांच्या झालेल्या वाताहतीमुळे दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी सत्तेची आशा जवळपास सोडलेलीच आहे. त्यामुळे आहे त्या परिस्थितीत किमान विरोधी पक्षनेतेपद मिळविण्याचेच त्यांचे मनसुबे लपून राहिलेले नाहीत. त्यामुळे आपल्याच पक्षाच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याच्या नादात आपल्याच सहकारी मित्रपक्षाच्या जागा कशा कमीत कमी निवडून येतील, यासाठी अंतर्गत तडजोडी होताना दिसत आहेत. 

भाजप-शिवसेनेची या निवडणुकीत युती झाली असली तरी त्यांचंही सर्व काही आलबेल नाही. सलग दोनवेळा केंद्रातील सत्ता स्वबळावर काबीज केल्यामुळे नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या करिष्म्यामुळे, गेल्या पाच वर्षांत घडलेल्या ठळक घडामोडींमुळे, काश्मीरबाबतचे 370 कलम रद्द केल्यामुळे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे देशभर तरुणाईच्या भाजपला मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे राज्यातील भाजप नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे मनोबल प्रचंड मोठ्या प्रमाणात उंचावल्याचे दिसत आहे. त्यामुळे ही निवडणूक आपल्यासाठी एकतर्फी असल्याची त्यांची भावना आहे. त्यामुळे तर युतीची चर्चा चालू झाल्यापासून भाजपमधून स्वबळाचा नारा उमटू लागला होता. आपणाला आता सत्ता मिळविण्यासाठी शिवसेनेच्या मदतीची आवश्यकता नाही, असा ठाम विश्वास नेते व कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होताना दिसतो आहे. त्याचा परिणाम म्हणून लोकसभा निवडणुकीत 144-144 चा फॉर्म्युला ठरला असतानाही ऐनवेळी भाजपचे नेते 164-124 चा फॉर्म्युला शिवसेनेच्या गळ्यात मारण्यात यशस्वी झाले. अगदी नाईलाजास्तव सेनेच्या नेत्यांना हा फॉर्म्युला मान्य करावा लागला आहे, अन्यथा शिवसेनेलाही गळती लागण्याचा धोका होता.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि सेनेत मोठी मेगाभरती झालेली आहे. दोन्हीकडे दाखल झालेले हे नेते म्हणजे 'राजकीयदृष्ट्या असंतुष्ट आत्मे' आहेत. कोणत्या ना कोणत्या तरी लाभाच्या आमिषापोटीच ही मंडळी सेना-भाजपच्या तंबूत डेरेदाखल झालेली आहेत. त्यामुळे त्यांची काही ना काही सोय या पक्षाच्या नेत्यांना लावावी लागत आहे. कधी उघडपणे तर कधी छुप्यारीतीने या आयारामांची सोय लावावी लागत आहे. त्यासाठी दोन्ही पक्षाचे नेते आपापल्या पातळीवर प्रयत्न करताना दिसत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून आज काही मतदारसंघांमध्ये युतींतर्गत बंडाचे झेंडे फडकताना दिसत आहेत. ज्या आयारामांना पक्षाने उमेदवारी दिलेली आहे, तिथले भाजप-सेनेचे जुने आणि निष्ठावंत कार्यकर्ते नाराज असल्याचे दिसत आहे. ही नाराजी मतपेटीपर्यंत पोहोचली तर युतीला काही ठिकाणी धक्का बसल्यास आश्चर्य वाटायला नको.

आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे काल-परवापर्यंत आपल्याच जोरावर लहान भाऊ म्हणून मिरवणारा भाजप आज शिरजोर झाल्याची सल नाही म्हणायला सर्वसामान्य शिवसैनिकांच्या मनात आहेच. त्यासाठी सेनेच्या काही नेत्यांनी व कार्यकर्त्यांनीही या निवडणुकीत स्वबळावर शड्डू ठोकण्याचा इरादा स्पष्ट केला होता. एकूणच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि भाजप-शिवसेना युती झाली असली तरी दोन्हींची पायाभरणी होताना कुठेतरी अविश्वासाच्या भेगा पडलेल्या जाणवून येतायत.

'वंचित'वर 'बी' टीमचा शिक्का कायम!

गेल्या लोकसभा निवडणुकीपासून वंचित बहुजन आघाडीवर भाजपची बी टीम म्हणून शिक्का बसलेला आहे. वंचितमुळे आघाडीचे आठ ते दहा उमेदवार पराभूत झाल्याचे स्पष्ट झालेले आहे. विधानसभा निवडणुकीतही वंचितने आपल्या धोरणात किंवा भूमिकेत बदल केलेला दिसत नाही. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि वंचितचे सूर विधानसभा निवडणुकीतही जुळू शकलेले नाहीत. शिवाय जागावाटपाच्या मुद्द्यावरून एमआयएमनेही वंचितची साथ सोडलेली आहे. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news