पुणे; पुढारी वृत्तसेवा : लाखो रुपये खर्च केल्या जाणाऱ्या सिंथेटिक ट्रॅकवर चक्क मंत्र्यांच्या वाहनांचा ताफा आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. नियोजनात चूक झाल्याचे लक्षात येताच क्रीडा विभागाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली असून, भविष्यात चूक सुधारण्यात येईल असे ही सांगण्यात आले आहे.
म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाबाबत खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला क्रीडामंत्री सुनील केदार, राज्य क्रीडामंत्री आदिती तटकरे यांच्यासह सचिव व अधिकारी उपस्थित होते.
ही बैठक ॲथलेटिक्स स्टेडियमच्या मुख्य स्टेडियममधील हॉलमध्ये घेण्यात आली. यामध्ये तीन मंत्र्यांची वाहने ट्रॅकवर गेली नसली तरी त्यांच्या ताफ्यातील वाहने मात्र ट्रॅकवर होती. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या ट्रॅक खराब होण्याची अधिक शक्यता आहे.
याबाबत क्रीडामंत्री सुनील केदार यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले, याबाबत आमच्याकडून नक्कीच चूक झाली आहे. भविष्यात अशा प्रकारे पुन्हा वाहने मैदानावर येणार नाहीत याची काळजी घेतली जाईल. तशा सूचना ही अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दरम्यान क्रिडा विभागानेही याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. आशा प्रकारची चूक पुन्हा होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे स्पष्ट केले आहे.
आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर होणार का कारवाई?
या दौऱ्याचे नियोजन करणाऱ्यांनी सिंथेटिक ट्रॅकचा विचार केला नाही. त्यामुळे संबंधित अधिकारी आणि क्रीडा आयुक्त यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस क्रीडामंत्री सुनील केदार दाखवणार का? असा प्रश्न खेळाडूंनी उपस्थित केला आहे.