कोल्हापूर : राधाकृष्ण मंडळाची गणेशोत्सवातील ४३ वर्षांची परंपरा, यंदा केदारनाथ मंदिराची प्रतिकृती | पुढारी

कोल्हापूर : राधाकृष्ण मंडळाची गणेशोत्सवातील ४३ वर्षांची परंपरा, यंदा केदारनाथ मंदिराची प्रतिकृती

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापुरात सार्वजनिक गणेशोत्सवाची दीर्घ परंपरा आहे. विविध तालीम संस्था, मंडळ, ट्रस्ट सामाजिक भान जपत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतात. यातीलच एक ठळक नाव म्हणजे शाहूपुरी येथील राधाकृष्ण मंडळ होय. राधाकृष्ण तरुण मंडळाचे नाव घेतले तर पटकन डोळ्यापुढे येते ते म्हणजे गणेशोत्सवानिमित्त साकारल्या जाणाऱ्या विविध मंदिर आणि राजवाड्यांच्या प्रतिकृती. यंदा मंडळाने उत्तराखंड येथील केदारनाथ मंदिराची भव्य प्रतिकृती साकारली आहे.

राधाकृष्ण मंडळाच्या देखाव्यांची सुरुवात

राधाकृष्ण मंडळाची स्थापना 1981 साली मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी केली. सुरुवातीला मांडवात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येत होती. सर्वात आधी मंडळाने मिनाक्षी मंदिराची प्रतिकृती साकारली. या देखाव्याला कोल्हापूरकरांनी मोठा प्रतिसाद दिला. त्यानंतर मंडळाने दरवर्षी एखादे मंदिर किंवा राजवाडा याची प्रतिकृती साकारण्याचा पायंडा पाडला. आतापर्यंत मंडळाने सर्वधर्म समभाव मंदिर, नटराज मंदिर, हवा महल, अक्षरधाम मंदिर, इस्कॉन टेम्पल बेंगलोर मधील आर्ट ऑफ लिविंगचे मंदिर, आंध्र प्रदेशातील गोल्डन टेम्पल, दिल्लीचे लोटस टेम्पल, जेजुरीचा खंडोबा थायलंडमधील बुद्ध टेम्पल अशा विविध मंदिराच्या व राजवाड्यांच्या प्रतिकृती केलेल्या आहेत.

यंदाचा देखावा केदारनाथ मंदिर

हे मंडळाच्या स्थापनेचे ४३वे वर्ष आहे. केदारनाथ मंदिराची प्रतिकृती साकारण्यासाठी ३० कारागीर तीन महिने काम करत होते. गणेशोत्सवातील १० दिवस विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये गणेश याग, दूध संततधार अभिषेक हे महत्त्वाचे कार्यक्रम आहेत. होम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी महाप्रसाद असतो. मंडळाने आधुनिक वाद्यांना नेहमीच फाटा दिला असून पारंपरिक वाद्यांचा वापर केला जातो, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष कपिल चव्हाण यांनी दिली.

विविध उपक्रम

मंडळाच्या वतीने पुस्तक पेढी, शिलाई मशीन वाटप, होतकरू विद्यार्थ्यांना दक्तक घेणे, रक्तदान शिबिर, शाडू मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. महापूर, कोरोना अशा संकट काळातही मंडळाने गरजूंना मदत केली आहे.

– (सचिन बनसोडे, मास कम्युनिकेशन विभाग, द्वितिय वर्ष, शिवाजी विद्यापीठ)

Back to top button