सोलापूर : बालविवाह केल्याप्रकरणी बार्शीत आई-वडील, पती, सासूवर गुन्हा | पुढारी

सोलापूर : बालविवाह केल्याप्रकरणी बार्शीत आई-वडील, पती, सासूवर गुन्हा

बार्शी : पुढारी वृत्तसेवा अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्याप्रकरणी आई, वडील, मामासह नातेवाईकांवर आणि छळप्रकरणी पती व सासू-सासर्‍यांविरुद्ध बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सबंधित 18 वर्षीय मुलीने बार्शी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चाईल्डलाईनच्या मदतीने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित मुलीचा विवाह झाला तेव्हा ती अल्पवयीन होती. तिची शिक्षणाची इच्छा असतानाही नातेवाईकांनी तिचा बार्शी तालुक्यातील मुलाबरोबर तिच्या इच्छेविरुद्ध विवाह लावून दिला. विवाहानंतर सासू, सासरे व पती यांच्याकडून तिचा छळ सुरू झाल्याने फिर्यादी आई-वडिलांकडे जाऊन प्रकार सांगितला. मात्र, आई-वडिलांनी तिला सासरी पाठविण्याचा प्रयत्न केला.

संबंधित मुलीचे मूळ गाव उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. तेथे आजी व आजोबासोबत राहून तेथेच ती 11 वीचे शिक्षण घेत होती. कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे कॉलेज बंद असल्याने ती मे 2020 मध्ये मूळगावी कोराळ (ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) येथे गेली. मे 2020 मध्ये तेथे सासरे दिलीप मेंडे, तिचा पती प्रवीण मेंडे व त्याचे नातेवाईक फिर्यादीला पाहण्यासाठी आले. प्रवीण मेंडे याने संबंधित मुलीस पसंत केले. वास्तविक तिला हा विवाह पसंत नव्हता. तिने माझे वय 17 असून मला अजून शिक्षण घ्यायचे असल्याचे आई व वडिलांना सांगितले. परंतु त्यांनी तिचे न ऐकता पती प्रवीण याच्या गावी उंडेगाव (ता. बार्शी, जि.) येथे नेऊन जून 2020 मध्ये विवाह लावून दिला. विवाहात कोरोनामुळे फक्त घरातील व प्रवीण मेंडे याचे घरातील लोक हजर होते. लग्नपत्रिकाही छापल्या नव्हत्या.

दरम्यान, सासरी राहताना पती प्रवीण मेंडे, सासू छाया मेंडे व सासरे दिलीप मेंडे हे तिला घरात कोंडून शेतात कामासाठी जायचे. घरातील कामावरून शिवीगाळ करायचे. याबद्दल मुलीने आई-वडिलांना सांगितले. परंतु, त्यांनी दुर्लक्ष केले. दरम्यान, सध्या ती आजी-आजोबांकडे आली. परंतु, जानेवारी 2021 मध्ये आई-वडील तिला घेऊन काशिमिरा येथे आले. आई- वडील हे सारखे सासरी जाण्याबाबत सांगत असल्याने चाईल्ड लाईन येथे फोन केला. त्यांना झालेला प्रकार सांगितला. त्यानुसार आई, वडील, पती प्रवीण मेंडे, सासू, सासरे दिलीप मेंडे, लग्न लावून देणारे भटजी, लग्न जमविणारे व वडिलांचे मामा राजाराम सुरवसे व इतर लग्नासाठी हजर असलेल्यांवर गुन्हा दाखल झाला.

Back to top button