औरंगाबाद-जळगाव महामार्गावर अपघात; ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार विद्यार्थी ठार | पुढारी

औरंगाबाद-जळगाव महामार्गावर अपघात; ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार विद्यार्थी ठार

सिल्लोड; पुढारी वृत्तसेवा : क्लासवरुन घरी जात असताना ट्रक खाली चिरडून एक पंधरा वर्षीय शाळकरी विध्यार्थी जागीच ठार झाल्याची घटना सिल्लोड येथे घडली. महेश कौतिकराव ताजने ( वय 15 ) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. मंगळवारी ( दि.28 ) रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास शहरातील औरंगाबाद-जळगाव महामार्गावरील शिवसेना भवन समोर हा अपघात झाला.

महेश कौतिक ताजने हा शहरातील श्री म्हसोबा महाराज मंदिर परीसरातील माऊली नगर येथील रहिवाशी आहे. मंगळवारी (दि 28)  सकाळी सहा वाजताच्या सुमारास तो दुचाकीने (क्र एम.एच. 20 बी.बी.1234) एका खाजगी क्लासला गेलेला होता. क्लास संपल्यानंतर घरी येत असताना सिल्लोड जळगांव महामार्गावरील शिवसेना भवन समोर भरधाव वेगाने समोरून येणाऱ्या ट्रकने महेशच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात महेश जागीच ठार झाला.

या घटनेची माहिती मिळताच सिल्लोड शहर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि ट्रक ताब्यात घेतला. शवविच्छेदन प्रक्रियेनंतर दुपारी 2 वाजताच्या सुमारास महेशवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विद्यार्थ्यांना अश्रू अनावर

महेश हा शहरातील छत्रपती शिवाजी हायस्कूल मध्ये इयत्ता 9 वी वर्गात शिकत होता. शाळेजवळील स्मशानभूमीत त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले, त्याच्या अंतिम संस्कार कार्यक्रमात महेश चे शिक्षक व त्याच्या वर्गातील मित्र देखील उपस्थित होते. आपला मित्र या जगात राहिला नाही हे पाहून विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले.

महेश चे वडील कौतीक ताजने हे रोज मजुरी करुन आपला उदरनिर्वाह चालवतात. मुलगा शिक्षणात हुशार होता. त्याला शिकविण्यासाठी कौतिक ताजने यांनी खाजगी क्लास लावलेला होता. ताजने यांना मयत महेशच्या पश्चात एक मुलगी आहे.

Back to top button