औरंगाबाद: दुचाकीवर पोवाडे लावून शिवभक्ताची शिवरायांना मानवंदना

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा: अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची यशोगाथा प्रत्येकांच्या कानी पडावी, शिवरायांचे विचार घराघरापर्यंत पोहचावे. यासाठी एक अवलिया शिवभक्त आपल्या दुचाकीवर पोवाडे लावून फिरतोय. शिवजयंतीदिनी रविवारी (दि.१९) त्यांनी पैठण तालुक्यातील अडुळ ते खुलताबाद परत औरंगाबाद शहर असा सुमारे शंभर किलोमीटरचा प्रवास केला.
शिवजयंतीनिमित्ताने शहरात शिवभक्तांचे जथ्थेच्या जथ्थे घोषणा देत निघाले असताना सांयकाळी चार वाजता जालनारोड वरुन एक ज्येष्ठ नागरिक दुचाकीवरुन पोवाडे लावत निघाले होते. यावेळी दैनिक ‘पुढारी’शी त्यांनी संवाद साधला.
पैठण तालुक्यातील अडुळ येथील रहिवासी असून, सर्वच जण आपल्याला जोशी महाराज नावाने ओळखतात, असे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शिवरायांचे शौर्य, पराक्रम, चातुर्य, बुद्धीमत्ता सर्वश्रुत असून, पोवाड्यातून ते क्षण आजही जिवंत भासतात. म्हणून शिवजयंतीनिमित्त आज दुचाकीवर पोवाडे लावले आहे. दरवर्षी गावोगावी, तालुक्याला फिरतो, सकाळी अडुळ वरुन खुलताबाद जाऊन आलो. आता औरंगाबाद शहरातून पुन्हा गावी परतत असल्याचे जोशी महाराज यांनी सांगितले. वर्षभर दिनविशेषाप्रमाणे आपण दुचाकीवर भजन-कीर्तन लावून फिरतो, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा