गडचिरोली : दुर्योधन रायपुरे हत्याप्रकरणी नगरसेवकास अटक | पुढारी

गडचिरोली : दुर्योधन रायपुरे हत्याप्रकरणी नगरसेवकास अटक

गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : शहरातील फुले वॉर्डातील सामाजिक कार्यकर्ते दुर्योधन रायपुरे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आज नगरसेवक तथा विद्यमान वित्त व नियोजन सभापती प्रशांत खोब्रागडे यास अटक केली आहे. यामुळे आरोपींची संख्या पाचवर पोहचली आहे.

२३ जूनच्या रात्री फुले वॉर्डातील सामाजिक कार्यकर्ते दुर्योधन रायपुरे(४८)यांची धारदार शस्राेलने वार करुन हत्या करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी ३ जुलैला अमन काळसर्पे(१८) यास अटक केली. पुढे ६ जुलैला प्रसन्ना रेड्डी(२४), अविनाश मत्ते(२६), धनंजय उके(३१) या तिघांना अटक करण्यात आली. चारही जण पोलिस कोठडीत आहेत. हे सर्वजण गोंदिया येथील रहिवासी आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी आज फुले वॉर्डाचा नगरसेवक प्रशांत खोब्रागडे(५०) यास अटक केली.

खोब्रागडे हा अपक्ष म्हणून निवडून आला होता. त्यानंतर त्याने भारतीय जनता पक्षाला समर्थन दिले. सध्या तो गडचिरोली नगर परिषदेचा वित्त व नियोजन सभापती आहे. डिसेंबर २०१६ मध्ये झालेल्या गडचिरोली नगर परिषदेच्या निवडणुकीत दुर्योधन रायपुरे यांनी प्रशांत खोब्रागडेच्या विरोधात निवडणूक लढवली होती. यात ते अत्यल्प मतांनी पराभूत झाले होते.

मात्र, त्यांचे सामाजिक कार्य आणि लोकप्रियता बघता ते पाच महिन्यांनी होणाऱ्या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आपणास वरचढ ठरु शकतात, या शंकेने प्रशांत खोब्रागडे याने दुर्योधन रायपुरेचा काटा काढला असावा की, आणखी दुसरे कारण आहे, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. पोलिस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक शरद मेश्राम प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Back to top button