ऐन सणासुदीत डाळी, कडधान्यांचे दर कडाडले

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : ऐन सणांच्या तोंडावरच डाळी, कडधान्याच्या भावामध्ये किलोमागे 10 ते 20 रुपयांची वाढ झाल्याने तसेच उपवासासाठी लागणारे बटाटा, साबुदाणा, शेंगदाण्याच्या भावातही वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांना महागाईची झळ सोसावी लागत आहे. श्रावण महिन्यात बाजारात डाळी कडधान्येची अवाक कमी तर मागणी जास्त असते. डाळींसोबतच कडधान्याच्या दरातही वाढ झाली आहे. डाळींमध्ये तूरडाळीचे दर सतत वाढत आहेत. इंधन दरवाढ व शासनाच्या धोरणांमुळे दरवाढ होत असून, जीएसटी मुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. हे दर येत्या काही दिवसांत आणखी वाढण्याची शक्यता व्यापार्यांकडून वर्तवण्यात येत आहे.
श्रावण महिन्यात अख्ख्या वालाची आवक कमी असल्याने बाजारात 170 ते 190 रु.वर पोहोचला आहे. डाळींचे सध्याचे भाव तूरडाळ : 100 ते 120 मुगडाळ : 90 ते 110 चणाडाळ : 70 ते 80 मसूर डाळ : 90 ते 100 तर कडधान्यामध्ये मूग : 90 ते 110 मटकी : 90 ते 110 चणे : 60 ते 70 वाटाणा : 60 ते 70 चणे : 90 ते 110 वाल : 180 ते 190 च्या घरात पोहोचली आहे. श्रावण महिन्यात उपवासामध्ये खाल्या जाणार्या खाद्य पदार्थांचे दर वाढले आहे. बटाटाही किरकोळ बाजारात 30 ते 40 रु. किलोवर पोहोचला आहे. साखर 10 ते 20 रुपये महागली आहे. साबुदाणाही किरकोळ बाजारात किलोमागे 15 ते 20 रुपयांनी महागला आहे.
उपवासासाठी खाल्ल्या जाणार्या भगरच्या भावात 20 रुपयांची वाढ झाली आहे. महागाईमुळे आधीच त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांकडून वाढत्या डाळीच्या, कडधान्याच्या किमतीमुळे सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. अशीच परिस्थिती आणखी काही दिवस राहिल्यास घर खर्चाचे महिन्याचे गणित बिघडणार असल्याची चिंता गृहिणींकडून व्यक्त केली जात आहे.
सर्वसामान्य माणूस आधीच महागाईने त्रस्त झाला आहे. त्यात सरकारकडून जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावल्यामुळे डाळी व कडधान्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. सरकारने सर्वसामान्यांचा विचार करून डाळी कडधान्यांच्या किमतींवर नियंत्रण आणावे.
– मीना गायकवाड
गृहिणी