सोलापूर : बालकांचे आधार कार्ड काढणे झाले सोपे | पुढारी

सोलापूर : बालकांचे आधार कार्ड काढणे झाले सोपे

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील प्रत्येक मुलाचे आधार कार्ड काढण्याची जबाबदारी जि.प.महिला व बालकल्याण विभागाने घेतली आहे. यासाठी आता प्रत्येक गावातील अंगणवाडीत आधार कार्ड मशिन देण्यात येणार आहे. यामुळे बालकांचे आधार कार्ड काढणे आता काढणं सोपं झालं आहे. यापूर्वी लहान बालकाचे आधार कार्ड काढण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत असे, मात्र महिला बालकल्याण विभागाने जिल्ह्यातील प्रत्येक गावांमधील अंगणवाडीत आधार कार्ड काढण्याची सोय करणार असल्याने बालकांचे आधार कार्ड गावातच काढता येणार आहे.

महिला व बालकल्याण विभागामार्फत सोलापूर जिल्हयासाठी 60 आधार नोंदणी मशिन प्राप्त झाल्या आहेत. त्यातील 48 मशिन ग्रामीण क्षेत्रासाठी तर 12 मशिन नागरी क्षेत्रासाठी प्राप्त आहेत. प्रत्येक प्रकल्पासाठी तीन याप्रमाणे 16 ग्रामीण प्रकल्पांना 48 आधार नोंदणी मशिन प्राप्त वाटप करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडील महाआयटी विभागाकडून आधार नोंदणी ऑपरेटर यांची निवड केली जाणारआहे.

सद्यस्थितीत मोठ्या गावातील मध्यवर्ती अंगणवाडी केद्रामध्ये तसेच पंचायत समितीमध्ये एक मशिन ठेवली जाणार आहे. ज्या बालकांची आधार नोंदणी अद्यापि झालेली नाही त्यांच्या पालकांनी नजीकच्या अंगणवाडी सेविकाकडे आधार नोंदणी कँपबाबत माहिती घेण्याचे आवाहन महिला व बाल कल्याण विभागाने केले आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे मार्गदर्शनाखाली आधार नोंदणी कँपचे आयोजन केले जाणार आहे.बालकांची आधार नोंदणी 30 सप्टेंबर पर्यंत पूर्ण करणेबाबत आयुक्त, महिला व बालविकास यांनी सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे लवकरात लवकर बालकांचे आधार कार्ड काढून घ्यावेत.
– जावेद शेख
जिल्हा कार्यक्रम अधिकारी,
महिला बालकल्याण विभाग, जि.प.

Back to top button