निवडणूक स्थगित तरीही गुरुजींचा प्रचार सुरूच! | पुढारी

निवडणूक स्थगित तरीही गुरुजींचा प्रचार सुरूच!

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची निवडणूक लांबल्याने उमेदवारांची घालमेल सुरू आहे. सप्टेंबरअखेरपर्यंत निवडणुकीला स्थगिती दिली आहे. त्यामुळे याकाळात उमेदवारांना प्रचार करण्यासाठी सुट्टीचा आधार घ्यावा लागत आहे. प्राथमिक शिक्षकांच्या जिव्हाळ्याची पतसंस्था म्हणून या सोसायटीकडे पाहिले जाते. जवळपास सात हजारांच्यावर मतदार या पतसंस्थेसाठी आहेत. प्रमुख दोन पॅनेलमध्ये या पतसंस्थेची निवडणूक होत आहे. राज्यात नवे सरकार अस्तित्वात आल्यामुळे त्यांनी सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम सप्टेंबरअखेरपर्यंत स्थगित केला आहे. या पतसंस्थेच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले होते. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर सरकारने निवडणुकांना स्थगिती दिली आहे.

निवडणुकीच्या रिंगणातील पॅनेलना निवडणूक चिन्हही मिळाले होते. मात्र निवडणूक स्थगित झाल्यामुळे ही सर्व प्रक्रिया आहे त्या स्थितीत स्थगित झाली आहे. शासकीय प्रक्रिया जरी थांबली असली तरी पॅनेलच्या प्रचाराची रेलचेल मात्र सुरूच आहे. पण निवडणुकीच्या काळात ज्याप्रमाणे असतो तेवढा जोर याकालावधीत दिसून येत नाही. प्राथमिक शिक्षक संघटनेमध्ये संभाजीराव थोरात व (कै.) शिवाजीराव पाटील या दोन गटांशिवाय शिक्षक समिती, आदर्श शिक्षक समिती, जुनी पेन्शन संघटना, मागासवर्गीय शिक्षक संघटना, शिक्षक भारती यासह इतर काही लहान संघटना या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.

थोरात व पाटील गटाने आपले पारंपरिक विरोधक असलेल्या आदर्श शिक्षक संघटनेशी घरोबा केला आहे. शिक्षक समितीने जुनी पेन्शन संघटना, शिक्षक भारतीशी हातमिळविणी केली आहे. एवढेच नाही तर शिक्षक संघाच्या काही शिलेदारांना आपलेसे करण्यातही शिक्षक समितीला यश आले आहे. शिक्षक संघ व इतर मित्रपक्षांचे गुरूसेवा पॅनेल व शिक्षक समितीच्या स्वाभिमानी परिवर्तन पॅनेलमध्ये जोरदार लढत होत आहे. निवडणूक पुढे गेल्याने उमेदवार व शिक्षकनेते हे शिक्षकांना सुट्टी दिवशी जाऊन भेटत आहेत. शनिवारी शाळांना दुपारुन सुट्टी असते, तर रविवारी पूर्ण दिवस सुट्टी असते. या सुट्टीच्या दिवशी शिक्षकांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेण्यावर दोन्ही पॅनेलने भर दिला आहे.

‘जुनी पेन्शन’मधील फूट कुणाच्या पथ्यावर

निवडणुकीच्या रणधुमाळीत जुनी पेन्शन हक्क संघटनेमध्ये फूट पडली आहे. संघटनेतील काही लोकांनी परिवर्तन पॅनेलशी हातमिळवणी केली आहे. काही लोक गुरुसेवा पॅनेलसोबत आहेत. त्यामुळे या संघटनेच्या फुटीचा फटका कोणाला बसणार, फायदा कुणाला होणार, हे निवडणुकीनंतर स्पष्ट होईल.

Back to top button