ओबीसी आरक्षण; इच्छुकांची वाढली धाकधूक | पुढारी

ओबीसी आरक्षण; इच्छुकांची वाढली धाकधूक

माळशिरस : अनंत दोशी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ओबीसी आरक्षणाचा निर्णय लागला आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत ओबीसी प्रवर्गाला आरक्षण मिळणार असल्याने खुल्या प्रवर्गातील इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. आपला जिल्हा परिषद गट अथवा पंचायत समिती गण जर ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झाला तर आपण कोठून उमेदवारी दाखल करावयाची, याची चिंता लागली आहे. अनेकवेळा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासाठी चर्चेत राहिल्या. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची मात्र कायम धाकधूक वाढत गेली. कारण ओबीसी आरक्षणाशिवाय जर निवडणुका झाल्या, तर खुल्या जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या जागा खुल्या प्रवर्गासाठी वाढणार होत्या.

त्यामुळे अनेक इच्छुकांना त्यामध्ये संधी मिळणार होती. त्यामुळे गट व गणांची रचना जाहीर झाल्यावर अनेक इच्छुकांनी गट व गणांत फिल्डिंग लावली होती. अनेकांनी मतदारांच्या गाठीभेठी घेण्यावर भर दिला होता. खुल्या प्रवर्गात इच्छुकांची संख्या जास्त होणार हे गृहीत धरून अनेकांनी राजकीय पक्षांकडे उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली होती. अनेकांनी जर राजकीय पक्षांची उमेदवारी नाही मिळाली तर अपक्ष उमेदवारी दाखल करण्याची तयारी केली होती.

दुसरीकडे, ओबीसी आरक्षण मिळण्याआधी ओबीसी प्रवर्गातील उमेदवार नाराज होते. त्यामुळे अनेकांची खुल्या गटातून निवडणूक लढण्याची मानसिकता नव्हती. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका झाल्या तर अनेक राजकीय पक्षांनी काही ठराविक गट किंवा गणांत ओबीसी उमेदवारांना उमेदवारी देण्याचे निश्‍चित केले होते. परंतु, त्या गट व गणांतील वाढती इच्छुकांची संख्या लक्षात घेता तेथे ही निवडणूक अटीतटीची होणार हे निश्‍चित होते. त्यामुळे ओबीसी इच्छुकांमध्ये निवडणुकीला सामोरे जाण्याची घालमेल दिसत होती.

सर्वोच्च न्यायालयाने बाठिया आयोगाने दिलेला अहवाल मान्य करुन आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणासह घेण्याचे आदेश दिल्याने या निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. ओबीसी आरक्षण कुठल्या गट व गणांत पडणार याची धाकधूक वाढली आहे. खुल्या प्रवर्गाच्या इच्छुकांच्या गट अथवा गणांत ओबीसीचे आरक्षण पडले तर त्याचा फटका त्यांना बसणार आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांनी देवाला साकडे घातले आहे.

माळशिरस तालुक्यात जिल्हा परिषदेचे 11 गट व पंचायत समितीचे 22 गण आहेत. ओबीसी प्रवर्गासाठी जिल्हा परिषदेच्या गटासाठी सोलापूर येथे, तर पंचायत समिती गणांसाठी माळशिरस पंचायत समिती सभागृहात आरक्षण सोडत आहे. माळशिरस पंचायत समितीमध्ये पंचायत समितीचे 22 गण असून ओबीसीचे 27 टक्के आरक्षण असल्याने साधारण 6 गण ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित होतील. त्यामुळे कोणते गण आरक्षित होणार, याचे अंदाज इच्छुकांसह राजकीय पक्ष बांधत आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार असल्याने ओबीसी प्रवर्गातील इच्छुक उमेदवारही निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

तरुण इच्छुकांची संख्या जास्त या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी तरुणवर्ग सक्रिय झाला आहे. अनेक जण ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य तसेच विकास सोसायटीचे सदस्य, अध्यक्ष तसेच तरुण मंडळांत सक्रिय आहेत. त्यांची राजकीय वाटचाल या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे पुढे जाणार आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी तरुण इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष तरुणांना किती संधी देतात, हे महत्त्वाचे आहे.

Back to top button