सोलापूर : ओबीसी आरक्षणाची सोडत 29 जुलैला | पुढारी

सोलापूर : ओबीसी आरक्षणाची सोडत 29 जुलैला

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारित आदेशानुसार सोलापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी काढण्यात आलेली सर्वसाधारण महिला आरक्षण रद्द करुन येत्या 29 जुलै रोजी नव्याने सोडत येणार आहे. याशिवाय ओबीसी आरक्षणाची सोडतदेखील याचवेळी होईल, अशी माहिती मनपाचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली. आयोागाच्या नव्या निर्णयानुसार मनपा निवडणुकीसाठी यापूर्वी सध्या अस्तित्वात असलेले सर्वसाधारण महिलांचे आरक्षण रद्द करण्यात आले आहे. अनुसूचित जाती व जमातीसाठी काढलेले आरक्षण मात्र कायम ठेवण्यात आले आहे. सर्वसाधारण महिला, नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग आणि नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग (महिला) या तीन विभागातील आरक्षण सोडत नव्याने करण्यात येणार आहे.

ओबीसी सदस्यांसाठी 30 जागा राहणार

मनपाची एकूण सदस्य संख्या 113 असून यापैकी 65 सर्वसाधारण सदस्य राहणार आहेत. यापैकी 33 जागा महिलांसाठी राखीव राहणार आहेत. अनुसूचित जातीसाठी 16 जागा राखीव असून यापैकी 8 जागा महिलांसाठी राखीव असतील. अनुसूचित जमातीसाठी 2 जागा असून यापैकी 1 जागा महिलेसाठी राखीव असेल. 27 टक्के आरक्षणानुसार ओबीसी सदस्यसंख्या 30 राहणार असून यापैकी 15 जागा महिलांसाठी राखीव असतील. सर्वसाधारण महिला तसेच ओबीसी आरक्षण सोडतीची अधिसूचना 26 जुलैला काढण्यात येणार असून 29 जुलैला सोडत काढण्यात येणार आहे.

ओबीसी आरक्षणाचे प्रारूप 30 जुलैला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रारूपला हरकत घेण्यासाठी 30 जुलै ते 2 ऑगस्टपर्यंत मुदत राहणार आहे. अंतिम आरक्षण 5 ऑगस्टला निश्चित करून ते राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याअनुषंगाने लोकसंपर्क वाढविण्यास सुरुवात केली आहे. विविध कार्यक्रमातील सहभागही वाढवला आहे.

Back to top button