बीअर शॉपी फोडणार्‍यास अटक; तीन फरार | पुढारी

बीअर शॉपी फोडणार्‍यास अटक; तीन फरार

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली येथील बीअर शॉपी फोेडणार्‍या अट्टल गुन्हेगाराला सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करुन त्याच्याकडून 7 लाख 86 हजार 340 रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला. अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराकडून 1 घरफोडी व 2 चोर्‍यांचे गुन्हे उघडकीस आले आहेत. याप्रकरणातील तीनजण अद्यापही फरार आहेत. मोहम्मद मधुकर पवार (वय 30, रा. ढोकबाभुळगाव, ता. मोहोळ, जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्याकडून 1 चारचाकी बोलेरो गाडी, 1 दुचाकी व बिअरचे बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. 9 ते 11 जुलै या कालावधीत फुलचिंचोली येथील महेश बीअर शॉपीचे लोखंडी शटर उचकटून व त्यामागील लाकडी दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी बीअर शॉपीमधून बीअरचे बॉक्स चोरुन नेले होते. याबाबत पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात उमाकांत अर्जुन काळे (वय 31, रा. फुलचिंचोली, ता. पंढरपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन 66 हजार 540 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना हा गुन्हा मोहोळ तालुक्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी मिळून केला असून त्यांच्यापैकी एकजण हा मुळेगाव येथील दामले वस्तीवरील असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी दामले वस्ती येथून मोहम्मद पवार यास ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी पवार याने हा गुन्हा आपल्या इतर तीन साथीदारांच्या मदतीने केला असल्याचे सांगितले.

कर्नाटकातील कलबुर्गी (गुलबर्गा) जिल्ह्यातील आळंद येथून एक बोलेरो जीप चोरुन आणून त्या वाहनाचा वापर करुन फुलचिंचोली येथील बिअर शॉपी फोडून त्यातील बॉक्स जीपमधून रोपळे (ता. पंढरपूर) येथील एका वस्तीवर ठेवल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी रोपळे येथील वस्तीवरुन बोलेरो जीप व त्यामध्ये असलेले बीअरचे बॉक्स जप्त केले. यावेळी पोलिसांनी याच वस्तीवरुन एक बिगर नंबरची दुचाकीदेखील जप्त केली असून या दुचाकीबाबत टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. अटक करण्यात आलेला गुन्हेगार हा सोलापूर शहर, सोलापूर ग्रामीण, पुणे, गुलबर्गा येथील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यास न्यायालयाने पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

या गुन्हेगाराकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून त्याच्या तीन फरार साथीदारांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. ही कामगिरी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक अनिल सनगल्ले, पोलिस हवालदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, धनराज गायकवाड, समीर शेख, नितीन चवरे यांनी केली.

Back to top button