साेलापूर : बनावट सोने तारण ठेवून 3 लाखांची फसवणूक | पुढारी

साेलापूर : बनावट सोने तारण ठेवून 3 लाखांची फसवणूक

मोहोळ : पुढारी वृत्तसेवा बनावट सोने तारण ठेवून एका इसमाने मोहोळ येथील सद्गुरू पतसंस्थेची तीन लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना शुक्रवार 15 जुलै रोजी उघडकीस आली. याप्रकरणी मोहोळ पोलिसांत एका खातेदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विष्णू औदुंबर भोसले (रा. पापरी, ता. मोहोळ) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
विष्णू भोसले याने शहरातील सद्गुरू ग्रामीण पतसंस्थेत सोन्याचे लॉकेट तारण ठेवून 3 नोव्हेंबर 2020 रोजी तीन लाख रुपये कर्ज घेतले होते. सोने तारण ठेवताना पतसंस्था प्रशासनाने पंतसस्थेचे सोनार प्रदिप पद्माकर दिक्षीत (रा. अनगर ता. मोहोळ) यांच्याकडे सोन्याचे खात्री करुन, वजन करुन त्याचे मुल्यांकन केले असता ढोबळ वजन 103.200 ग्रॉम व निवळ वजन 81.5 ग्रॉम प्रमाणे सोन्याची अंदाजे किंमत तीन लाख एक हजार पाचशे पन्नास रुपये इतकी झाली होती.

दरम्यान सोने तारण कर्जाची एक वर्षाची मुदत संपल्यानंतर पतसंस्था प्रशासनाने त्यास कर्जाची व्याजासह रक्कम भरून सोने सोडवून घेण्याबाबत तगादा लावला. त्यानंतर विष्णू भोसले यांनी पतसंस्थेत येऊन माझे सोने मोडून तुमच्या कर्जाची रक्कम व्याजासह वळती करून घ्या, असे सांगितल्यामुळे पतसंस्थेचे व्यवस्थापक राहुल देशपांडे यांनी विष्णू भोसले यांना तुमच्या पसंतीच्या सोनाराकडे सोने मोडून त्यातून आलेली रक्कम कर्जापोटी पतसंस्थेकडे भरा असे सांगितले. त्यानुसार विष्णू भोसले हे पतसंस्थेचे कर्मचारी जावेद शेख यांना घेऊन शहरातील शारदा ज्वेलर्सचे मालक शिवाजी गायकवाड यांच्याकडे गेले.

यावेळी त्यांनी सोन्याची तपासणी करून त्या सोन्याचे मूल्यांकन 4 लाख 49 हजार 820 इतके केले. ही रक्कम देण्यापूर्वी शिवाजी गायकवाड यांनी विष्णू भोसले यांच्याकडे सोन्याची पावती मागितली असता, त्याने हे सोने माझ्या आजोबाचे असल्यामुळे त्याची पावती नसल्याचे सांगितले. त्यामुळे शिवाजी गायकवाड यांना संशय आल्याने त्यांनी सोने आटवुन जे वजन येईल त्याप्रमाणे रक्कम देण्याचे ठरले.

भोसले यांनीही त्यास मान्यता दिली. ते सोने घेवुन म्हेत्रे अँण्ड सन्सचे मालक गणेश निकम (रा चाटी गल्ली मोहोळ) यांच्याकडे आटवले असता, सोन्याची शुध्दता केवळ 14.93 टक्केच असल्याचे आढळुन आले व त्याची किमंत केवळ 60 हजार इतकी झाल्यामुळे हे सोने बनावट असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सदगुरु पतसंस्थेचे व्यवस्थापक राहुल प्रदीप देशपांडे यांनी मोहोळ पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार विष्णू भोसलेवर गुन्हा दाखल झाला. तपास हेड कॉन्स्टेबल विजय माने करीत आहेत.

Back to top button