पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा माझा अर्ज मंजूर होऊ नये यासाठी अनेक अडथळे निर्माण केले गेले. यावर मी न्याय मागितला आहे. शेतकरी, कामगार वर्ग आणि सभासद यांना न्याय मिळावा, यासाठी निर्मळ भावनेने ही निवडणूक बिनविरोध व्हावी. यासाठी प्रयत्न केले. परंतु ते निष्फळ ठरले. म्हणून निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. या र्व शेतकरी सभासद, कामगार वर्ग यांना साथ व न्याय देणार असून हा कारखाना सक्षमपणे चालवणार आहे.' असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी केले.
श्री विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीत रोंगे यांनी नारळ फोडून पॅनेल उभारले असल्याने या निवडणुकीला आज खर्या अर्थाने रंग चढल्याचे दिसून आले. ऐन एकादशीच्या निमित्ताने साक्षात विठ्ठलाच्या साक्षीने नामदेव पायरीजवळ नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला. मागील वेळी सत्ताधारी असलेले भारत भालके यांच्या विरोधात तब्बल सहा हजार मते मिळवून आपल्या अभ्यासू नेतृत्वाचे दर्शन रोंगे यांनी घडवले होते.
त्यावेळी लक्षवेधी ठरलेले डॉ. बी.पी. रोंगे जरी त्यावेळी पराभूत झाले असले तरीही त्यांना मिळालेली मते ही विजयाच्या समीप नेणारी होती. त्यांनी कोर्टी, सोनके, तिसंगी या ठिकाणी भेट देऊन सभासदांशी चर्चा केली. या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी श्री विठ्ठल परिवर्तन व विकास पॅनलचे प्रचार प्रमुख संभाजीराजे शिंदे, पांडुरंग नाईकनवरे, पोपट पाटील, तात्यासाहेब होळकर, सरकार यादव, नितीन काळे, पांडुरंग देशमुख, प्रेमलता रोंगे, यांच्यासह तालुक्यातील शेतकरी, सभासद व सहकारी उपस्थित होते.