सोलापूर : 8.40 लाखांची दारू जप्‍त | पुढारी

सोलापूर : 8.40 लाखांची दारू जप्‍त

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सोलापूर विभागाने आज (दि. 19) पहाटे 3.30 वाजता गेंट्याल टॉकीज चौक येथे सापळा रचून गोवा राज्य निर्मित विक्रीस असलेला मद्याचा आठ लाख 40 हजार 960 रुपये किमतीचा मद्यसाठा वाहतूक करणार्‍या टेम्पोसह जप्त केला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने 19 जून रोजी पहाटे 3.30 वाजता गेंट्याल चौक येथे एका टाटा 407 टेम्पो वाहनातून विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याच्या मिळालेल्या माहितीनुसार उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचला.

त्यानुसार टेम्पो क्रमांक एमएच04 ईबी 6050 हा चौकात येताच त्याची तपासणी केली. त्यात शिवा बाबू राठोड, (रा. विजापूर) व इरेश गंगाधर नावडे (रा. भवानी पेठ, सोलापूर) आढळून आले. त्यांना सदर वाहनात काय आहे अशी विचारणा केली असता त्यात विदेशी दारू असल्याचे त्यांनी सांगितले. वाहनाची तपासणी केली असता गोवा राज्यात विक्रीस व महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेल्या विदेशी मद्याचा साठा आढळला.

सदर साठ्यामध्ये गोवा बनवटीची एकूण 110 बॉक्स होते. जप्त केलेल्या दारू साठ्याची किंमत आठ लाख 40 हजार 960 रुपये असून वाहनाच्या किमतीसह एकूण 14 लाख 40 हजार 960 रुपये किंमतीचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला. अटक केलेल्या दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून सदर गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार सागर माळी (रा. मंद्रुप ता. दक्षिण सोलापूर) हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक, उपअधीक्षक आदित्य पवार, दुय्यम निरीक्षक भरारी पथक सोलापूर एस. ए. पाटील, सुरेश झगडे, दुय्यम निरीक्षक श्रीमती मिसाळ व सहायक दुय्यम निरीक्षक होळकर, जवान कर्मचारी सावंत, ढब्बे, चेतन व्हनगुंटी, वाहन चालक दिपक वाघमारे व मदने यांनी केली.

Back to top button