उद्यापासून कडक लॉकडाऊन | पुढारी | पुढारी

उद्यापासून कडक लॉकडाऊन | पुढारी

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी  दि. 2 जून ते 8 जून या कालावधीत कडक लॉकडाऊनचे आदेश जारी केले आहेत. मेडिकल आस्थापना 24 तास सुरू राहणार असून सर्व प्रकारची दुकाने व इतर  सर्व आस्थापना पूर्ण बंद राहणार आहेत. दूध व किराणा फक्‍त घरपोहोच देण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्याच्या सीमाही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह सापडण्याचे प्रमाण 17 टक्क्यांपेक्षा जास्त आहे तर मृत्यूचे प्रमाण 3.31 च्या वर आहे. जिल्ह्यात सुमारे 67 टक्के रुग्णांनी ऑक्सिजन बेड व्यापले आहेत. त्यातच नियम कडक करूनही नागरिकांकडून त्यांना हरताळ फासला जात आहे. सकाळी 7 ते 11 या वेळेत अत्यावश्यक वस्तू खरेदीच्या नावाखाली मोठी गर्दी होताना दिसत आहे. बँक व अन्य व्यवसायासाठीही अनेकजण बाहेर पडत आहेत. त्यामुळे निर्बंध असूनही त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. 

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या दोन महिन्यात जवळपास पंचवीस हजारहून अधिक रुग्ण सापडले आहेत. मे महिन्यामध्ये तेरा हजारच्या पुढे रुग्ण संख्या गेली आहे. रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रतिबंध लागू करूनही कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळेच कोरोना साखळी तुटण्यासाठी दि. 2 जून रोजी सकाळी 7 ते 8 जून रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत हे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 

पावसाळा तोंडावर असल्याने शेतीच्या पेरणीचा हंगाम विचारात घेता कृषी विषयक संलग्‍न सर्व दुकाने सकाळी 7 ते 2 या काळात सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

जिल्ह्याच्या सीमा बंद

रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा अन्य जिल्ह्यातून प्रवेश करण्यास किंवा अन्य जिल्ह्यांमध्ये जाण्यास बंद करण्यात येणार आहेत. नातेवाईकांचे अंत्यसंस्कार, वैद्यकीय उपचार व कोव्हिड व्यवस्थापनासाठी अत्यावश्यक सेवा किंवा आणीबाणीच्या प्रसंगी जिल्ह्यात येण्यास व बाहेर जाण्यास मुभा देण्यात येणार आहे. जिल्ह्यात प्रवेश करणार्‍या कोणत्याही व्यक्‍तीस 48 तास आधी कोव्हिड 19 चे निगेटिव्ह चाचणी प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे.

आजपासून दोनशे गावांमध्ये संस्थात्मक विलगीकरण

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला रोखण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडलेल्या संकल्पनेनुसार रत्नागिरी जिल्ह्यात 1 जूनपासून ‘माझं गाव, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे. सोबतच गृहविलगीकरण बंद करून ग्रामकृती दलांच्या मदतीने 200 गावांमध्ये संस्थात्मक विलगीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सोमवारी ही माहिती दिली. याबाबत तालुकास्तरीय महसूल तसेच पोलिस अधिकार्‍यांशी दूरद‍ृश्य प्रणालीद्वारे एक बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीस पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांची प्रमुख उपस्थिती होती. आपण आता एका निर्णायक टप्प्यावर असून, यावेळी मोठ्या प्रमाणावर कृतीद्वारे आपण दुसर्‍या लाटेवर पूर्णपणे नियंत्रण मिळवू, असा विश्वास जिल्हाधिकार्‍यांनी व्यक्त केला. 

दिवसाला साधारण 500 रुग्ण जिल्ह्यात आढळून येत आहे. या प्रत्येक पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील किमान 20 जणांच्या चाचण्या होणे आवश्यक आहे, असे उद्दिष्ट ठरवून तालुक्यांच्या ठिकाणी मोबाईल तपासणी पथके कार्यान्वित करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत. 2000 पेक्षा अधिक लोकसंख्या असणार्‍या गावात शाळा, मंगल कार्यालये अशा जागांवर संस्थात्मक विलगीकरण व्यवस्था करणे तसेच तपासणी झालेल्या व्यक्तीला तपासणीचा रिझल्ट प्राप्त होईपर्यंत इतरांमध्ये मिसळू न देणे आदी बाबी केल्या जातील, यासाठी काही कमी लोकसंख्येच्या गावांनी पुढाकार घेतला तरी त्यांना संमती द्यावी असे जिल्हाधिकारी म्हणाले.

जिल्ह्यात सर्वत्र ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींसाठी रत्नागिरी शहराप्रमाणे मोबाईल लसीकरण सुरू करण्याच्या सूचना देखील या बैठकीत देण्यात आल्या. नोकरी निमित्ताने अथवा शिक्षणासाठी परदेशात जाणार्‍या व्यक्तींना त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करून खात्री पटल्यावर पात्र व्यक्तींचे लसीकरण विना अपॉईंटमेंट करण्याबाबतही यावेळी सूचना देण्यात आल्या.

Back to top button