धावत्या रेल्वेसोबत सेल्फी काढणे जीवावर बेतले! | पुढारी

धावत्या रेल्वेसोबत सेल्फी काढणे जीवावर बेतले!

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : मित्रांसोबत चिकलठाणा रेल्वे स्थानक परिसरात फिरायला गेल्यानंतर प्लॅटफॉर्मवर उभे राहून धावत्या रेल्वेसोबत सेल्फी काढणे तरुणाच्या जीवावर बेतले. रुळावरून मालगाडी धावत असताना तो प्लॅटफॉर्मवर उभा राहून सेल्फी काढत होता. तेवढ्यात तोल जाऊन तो रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्यामध्ये कोसळला. यात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला, पायही मोडला. दरम्यान त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असतानाच जीव गमवावा लागला. काल (दि.१९) मे रोजी ही घटना घडली.

अधिक वाचा : गाल कन्स्ट्रक्टरवर नेमके काय घडले?

शेख शोएब शेख महेबूब (२०, रा. पटेलनगर, चिकलठाणा) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो शेंद्रा एमआयडीसीतील कंपनीत कामाला होता. आई-वडील आणि लहान भावासोबत तो चिकलठाणा भागात राहायचा. मंगळवारी दुपारी तो आणि त्याचे चार मित्र चिकलठाणा रेल्वे स्थानक परिसरात फिरायला गेले होते. 

अधिक वाचा : परप्रांतातून मुंबईत पसरतोय कोरोना

सर्वजण आपापल्या मोबाइलमध्ये फोटो काढत होते. शोएबही प्लॅटफॉर्मवर उभा राहून सेल्फी काढत होता. तेवढ्यात मालगाडी आली. त्याने धावत्या रेल्वेसोबत सेल्फी काढण्याचे ठरविले. तो रेल्वेकडे पाठ करून प्लॅटफॉर्मवर उभा राहिला. पाठीमागून रेल्वे धावत असताना इतर मित्र त्याला अशा पद्धतीने सेल्फी काढून जीव धोक्यात घालू नको, असे ओरडत होते. त्यांनी त्याला इशाराही केला होता. 

अधिक वाचा : म्युकर मायकोसिसचे आठवड्याला ५०० रुग्ण

परंतु, शोएबने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि सेल्फी काढणे सुरूच ठेवले. गाडीने वेग घेताच त्याचा तोल गेला आणि तो रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्यामध्ये पडला. धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला. तसेच, रेल्वे आणि पटरीमध्ये पाय अडकल्याने पायदेखील तुटला. रेल्वे निघून जाताच मित्रांनी त्याला उचलून वर घेतले.

तेथूनच लावला मामाला फोन

रेल्वेच्या धक्क्याने गंभीर जखमी झाल्यानंतर मित्रांनी शोएबला प्लॅटफॉर्मवर उचलून ठेवले. त्यानंतर शोएबने तेथूनच मामाला फोन लावून अपघाताची माहिती दिली. त्यांनी त्याला तत्काळ हॉस्पिटलमध्ये जाण्यास सांगितले. मित्र त्याला गाडीवरून घाटी रुग्णालयात घेऊन गेले. तो रस्त्याने मित्रांशी बोलला. परंतु, रुग्णालयात जाण्यापूर्वीच तो बेशुद्ध पडला. घाटीत दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Back to top button