अरुण गवळीने कमलाकर जमसंडेकरांची अशी घडवून आणली हत्या…

पुढारी ऑनलाईन डेस्क

दगडी चाळीची दहशत पाहून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे भर सभेत अरुण गवळीचे कौतुक करीत म्हणाले की, "तुमच्याकडे दाऊद तर, आमच्याकडे आमचा अरूण गवळी आहे", अशा शब्दांत त्यांनी कौतुक केले होते. एका राजकीय पक्षाच्या प्रमुखाने केलेलं कौतुक गवळीसाठी महत्वाचं होतंच. पण, शिवसेनेशी गवळीचं फारसं जमलं नाही. अरुण गवळीने अखिल भारतीय सेना नावाचा पक्ष सुरू केला. तो आमदार म्हणूनही निवडून आला. त्याचा चांगला राजकीय प्रवास सुरू असताना त्या शिवसेनेचा नगरसेवक कमलाकर जमसंडेकर याच्या हत्येत अटक झाली आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. जमसंडेकर हत्या प्रकरण ही घटना त्याला तुरुंगांची हवा खाण्यास भाग पाडली. ते प्रकरणातून शिवसेना आणि अरुण गवळी आपण समजून घेतलं पाहिजे. 

अधिक वाचा ः GANG'S of दगडी चाळ! कशी तयार झाली अरुण गवळी उर्फ डॅडीची गॅंग? 

२००७ साली मुंबई महापालिकेची निवडणूक सुरू झाली. त्यात अखिल भारतीय सेनेचा म्हणजेच डॅडीच्या पक्षाचा अजित राणे म्हणून मोहिली गाव (एल वाॅर्ड) येथून उभा राहिलेला होता. परंतु, कमलाकर जमसंडेकर यांनी अजित राणेचा दारूण पराभव केला. निवडणुकीनंतर केवळ महिन्याभरातच म्हणजेच २ मार्च रोजी मोहिनी पाईप लाईनजवळ असलेल्या असल्फा गावातील रुमानी मंझिल चाळीतील घरात जमसंडेकर बसलेले होते. त्यावेळी त्यांच्या घरातील सदस्यही उपस्थित होते. 

अधिक वाचा ः 'या' पोलिस अधिकाऱ्याचं नाव जरी ऐकलं, तरी 'डॅडी'ला घाम फुटायचा!

अचानक मोठा आवाज घरात आला. जमसंडेकर यांची पुतणी धावत धावत बाहेर आली, तर काका कमलाकर जमसंडेकर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. त्याच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्त वाहत होतं. त्याचवेळी दरवाजातून दोन व्यक्ती पळून जाताना दिसले. तातडीने जमसंडेकर यांना राजावाडी रुग्णालयात नेण्याच्या प्रयत्नात असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. जमसंडेकर हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड होते साहेबराव भिंताडे आणि बाळू सुर्वे. खरंतर भिंताडे हे कमलाकर जमसंडेकर यांचे राजकीय गुरू होते. परंतु, राजकारण आणि काही प्राॅपर्टीसंबंधी जमसंडेकराचे भिंताडे आणि बाळु सुर्वे यांच्यात वाद झाले होते. त्यामुळे त्याचा राग दोघांच्या डोक्यात होता. त्यांनी सुर्वे व जमसंडेकर यांचा गेम करण्याचा प्लॅन केला. हत्येची सुपारी अरुण गवळी उर्फ डॅडीकडे आली.  

वाचा ः डॅडी अन् जुबेदाचं प्रेम प्रकरण माहीत आहे का?

असं सांगितलं जातं की, या हत्येसाठी ३० लाखांची सुपारी गवळीला देण्यात आली होती. ही सुपारी गवळीने प्रताप गोडसेला दिली. आपले नाव येऊ नये म्हणून या प्रकरणात नवे शूटर्स शोधण्यात आले. गोडसेने या कामगिरीसाठी श्रीकृष्ण गुरव याच्यामार्फत नरेंद्र गिरी आणि विजयकुमार गिरी यांची निवड केली. दोघांनाही अडीच लाख रुपये देण्याचे ठरले. त्याचे २० हजार रुपयांचेही एडव्हान्सही देण्यात आले. विजयकुमारने अशोककुमार जयस्वालला सोबत घेऊन १५ दिवस कमलाकर जमसंडेकरांवर पाळत ठेवली आणि शेवटी २ मार्च २००७ रोजी घरात घुसून जमसंडेकरांची हत्या केली. 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news