रत्नागिरी जिल्ह्यात रेड अलर्ट | पुढारी

Published on
Updated on

रत्नागिरी/चिपळूण : पुढारी वृत्तसेवा भारतीय हवामान विभागाच्या कुलाबा वेधशाळेने कोकणात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात प्रशासनाने रेड अ‍ॅलर्ट जाहीर केला आहे. मात्र, शुक्रवारी दुपारपर्यंत ऊन तर दुपारनंतर मुसळधार पावसाच्या सरी असे वातावरण होते. अमावास्या असल्याने समुद्र खवळलेला होता.

पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मान्सूनचा पश्चिमेकडचा प्रवास हे सर्व गृहीत धरून पश्चिम किनारपट्टीवर अतितीव्र स्वरुपाचा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोकणातील सर्वच जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. रत्नागिरी व रायगड जिल्ह्यामध्येच 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला असून जिल्हा प्रशासनाने आपत्तीला सामोरे जाण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. 

हवामान खात्याने दिलेल्या इशार्‍यानुसार चिपळूण शहर परिसरात शुक्रवारी (दि. 11) सकाळी 10 वाजल्यापासून पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावण्यास सुरुवात केली. मात्र, ढगफुटी आणि अतीमुसळधार पावसाची शक्यता सकाळपासूनच्या संततधार सरींनी सद्यस्थितीत तरी फोल ठरवली आहे.

जिल्हा प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे चिपळुणातील स्थानिक प्रशासनाने सर्व ती सुरक्षा उपाययोजना केली आहे. सोमवारच्या सुमारास हा अतिवृष्टीचा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यानंतर हवामान बदलाचा अंदाज घेतला असता गुरुवारी रात्री उशिरापर्यंत पावसाची हलकी सर सोडल्यास चिपळूण शहर परिसरात पावसाच्या सरीचे सातत्य दिसून आले नाही. अधुनमधून पावसाची सर व सूर्यदर्शन अशा वातावरणात गुरुवारची वेळ निघून गेली. दरम्यान, शुक्रवारी पहाटेपासून  वातावरणात अचानक बदल दिसून येऊ लागले. पावसाची चाहूल देणारे ढग आणि वातावरण तयार झाले तर प्रत्यक्षात पावसाला शुक्रवारी सकाळी 10 वाजल्यानंतर सुरुवात झाली. सुरूवातीला तासभर पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. त्यानंतर सरींचा जोर कमी होऊन हलक्या सरींना सुरुवात झाली. दुपारी उशिरापर्यंत पावसाच्या सरी कोसळत होत्या तर वातावरण निवळले होते.

पावसाची शक्यता लक्षात घेता व्यापारी व नागरिकांसह अनेकजण सावध झाले होते. प्रशासनानेही अतिमुसळधार पावसाचा अंदाज घेत आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली होती. एकूणच वर्तविलेल्या अंदाजानुसार शुक्रवारच्या दिवशी दमदार हजेरी लावली. हा पाऊस शेतीकामासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.

आपत्ती निवारण पथके कार्यान्वित

जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने पूरस्थिती उद्भवल्यास प्रशासन सज्ज झाले आहे. चार 'एनडीआरएफ'ची (राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक) पथके दाखल झाली असून, साडेपाच हजार लोकांच्या स्थलांतराची व्यवस्था केली आहे. समुद्र, खाडी, नदी किनार्‍यावरील पूरग्रस्त, दरडग्रस्त भागात प्रवासासाठी प्रतिबंध घातले आहेत. जिल्ह्यात पूरग्रस्त 31 आणि दरडग्रस्त 45 ठिकाणे आहेत. धोकादायक ठरणार्‍या ठिकाणांवर 5 हजार 500 कुटुंबे असून, आवश्यकता भासल्यास त्यांचे स्थलांतर करण्याची तयारी केली आहे. पूर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी एनडीआरएफची चार पथके जिल्ह्यात दाखल झाली आहेत. त्यातील वीस जणांचे एक पथक रत्नागिरीत आहे. शुक्रवारी त्यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी केली. चिपळूण, खेडसह राजापूरला तीन पथके कार्यरत झाली आहेत. प्रत्येक पथकाकडे तीन फायबर बोटी असून, अन्य आवश्यक साहित्य उपलब्ध आहे. रत्नागिरी तालुक्यात सोमेश्वर, हरचिरी चांदेराई, टेंभ्ये यासह खाडी किनार्‍यांवरील 56 गावांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. सोमेश्वर येथे फायबर बोट आणि बोये सज्ज ठेवले आहेत. 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news