…तर नौका मालकांना नुकसानभरपाई नाही | पुढारी

...तर नौका मालकांना नुकसानभरपाई नाही

रत्नागिरी : प्रतिनिधी

मिरकरवाडा बंदरातील गाळ काढण्याचे काम सध्या वेगाने सुरु आहे. मात्र, काही नौका मालकांनी त्यांच्या बंद तसेच निकामी नौका बेवारस स्थितीत सोडल्या आहेत. गाळ काढताना या नौकांचे नुकसान झाल्यास शासनाकडून कोणतीही नुकसान भरपाई मिळणार नाही, असे मत्स्य व्यवसाय विभाकडून नौका मालकांना कळविण्यात आले आहे.

बंद पडलेल्या अनेक मासेमारी नौकांचे मालक येथील बंदरात आपल्या या नौका बंदर विभागाला कोणतीही माहिती न देता मिरकरवाडा बंदरात सोडून गेलेले आहेत. त्यांपैकी काही मासेमारी नौकांवर (सलमान तबस्सुम क्र. आयएनडी-एमएम-1241 , समर्थ क्र. आयएनडी-एमएच-4- एमएम-2885, मंदारमाला क्र. आयएनडी- एमएच-4-एमएम-803, वाद्येश्‍वर प्रसन्न  क्र. आयएनडी-एमएच-5-एमएम-269, हाजी झकरिया क्र. आयएनडी-एमएच-4-एमएम-1534, शिवदत क्र. आयएनडी -एमएच-4- एमएम-3002)अशी नावे व क्रमांक आहेत. काही नौकांवर नांव व नंबर नसल्याने त्यांच्या मालकांचा शोध घेणे अडचणीचे होत आहे. 

या बेवारस नौकांमुळे मिरकरवाडा बंदरातील गाळ काढणे अडचणीचे  ठरत आहे. या नौका मालकांच्या बंद ठेवलेल्या तसेच निकामी व नादुरुस्त नौका मिरकरवाडा बंदरात बेवारस स्थितीत पडून आहेत. या नौका त्यांनी दोन दिवसांत काढून न्याव्यात, असे आवाहन मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी मिरकरवाडा यांच्याकडून करण्यात आले आहे. 

दरम्यान, बंदरातील गाळ काढताना या नौकांची मोडतोड झाल्यास किंवा त्या नौका दुसर्‍या ठिकाणी काढून ठेवताना नौकांचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित नौका मालकांवर राहील व त्याची कोणतीही नुकसानभरपाई शासनाकडून मिळणार नाही, याची सर्व नौकामालकांनी  व जनतेने नोंद घ्यावी, असे आवाहन मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी यांनी केले आहे.
 

Back to top button