मराठा आरक्षणासाठी ठोक आंदोलनच | पुढारी

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
अनेक वर्षांचा लढा, लाखोंच्या संख्येने मूक मोर्चे, लोकशाही मार्गांनी विविध आंदोलने, अनेक समाज बांधवांनी प्राणार्पण करूनही मराठा समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळालेले नाही. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारला जाग आणण्यासाठी मूक आंदोलन चालणार नाही. आता ठोक मोर्चाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे येथून पुढे मराठा आरक्षणासाठी ठोक आंदोलनच करू, असा निर्धार सकल मराठा समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आला. याची सुरुवात मंगळवारी ताराराणी चौकातून झाली. यावेळी येथे सुमारे तासभर चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
छत्रपती ताराराणी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आणि भगवा ध्वज फडकवून या आंदोलनाची सुरुवात झाली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, महेश जाधव, सुजित चव्हाण, दिलीप पाटील, दिलीप देसाई, अॅड. बाबा इंदुलकर, जयेश कदम, बाबा पार्टे, निवासराव साळोखे, सचिन तोडकर, श्रीकांत भोसले, अजित राऊत, सत्यजीत कदम, अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे-पाटील, राजसिंह शेळके, मुरलीधर जाधव, रुपाराणी निकम, पै. अमृत भोसले, वैभव माने यांच्यासह विविध संस्था-संघटना, तालीम-मंडळांचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संभाजीराजे यांच्या आंदोलनाला सदैव पाठींबा…
खासदार संभाजीराजे यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला आमचा सदैव पाठींबा राहिल असे आंदोलन कत्र्यांनी स्पष्ट केले. संभाजीराजे यांनी केलेल्या मागण्यांशिवाय इतर मागण्यांसाठी सकल मराठा समाजाचे आंदोलन सात्तत्याने सुरुच राहिल अशी घोषणा यावेळी करण्यात आली.