दोडामार्ग तालुक्यातील मांगोली धबधबा प्रवाहित | पुढारी

दोडामार्ग तालुक्यातील मांगोली धबधबा प्रवाहित

दोडामार्ग; रत्नदीप गवस : महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या तीन राज्यांसह सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो पर्यटकांसाठी वर्षा पर्यटनास प्रसिद्ध असलेल्या दोडामार्ग तालुक्यातील मांगेली (फणसवाडी) येथील धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहीत  झाला आहे, पण कोरोनाने येथे पर्यटकांस येण्यास बंदी असल्याने हा संपूर्ण परिसर पर्यटकांविना सुनासुना दिसत आहे.

सह्याद्रीच्या कडे-कपारीतून कोसळणारा धबधबा , दाट धुके, सतत रिमझिम पडणारा पाऊस , या सर्व गोष्टी एकत्रित  मांगेली धबधबा आणि तेथील परिसरात अनुभवण्यास मिळतात. म्हणूनच गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून हे स्थळ  पर्यटकांस वर्षा पर्यटनाचे केंद्र आहे. गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने हा धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे.

दरवर्षी हजारो पर्यटक या ठिकाणी पर्यटनाची मजा लुटण्यासाठी येतात. त्यामुळे स्थानिकांना देखील थोड्या प्रमाणात हॉटेल व्यवसायातून आर्थिक उत्पन्नाचे साधन प्राप्त होते. मात्र दोन वर्षात या सर्वच उलाढालीला कोरोनामुळे ब्रेक लागला आहे. बाहेरून येणाऱ्या पर्यटकांकडून कोरोनाचे संक्रमण  वाढू नये, यासाठी धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकास येण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे हा परिसर पर्यटकाविना सूनासूना दिसत आहे.

आठ दिवसांपूर्वी कोरोना चा फैलाव अधिक होऊ नये यासाठी मांगेली सरपंच विश्वनाथ गवस यांनी धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकांस येण्यास बंदी असल्याचे जाहीर केले आहे, तसेच तालुका प्रशासनास देखील लेखी पत्र देऊन सहकार्य करण्याची विनंती केलेली आहे.

Back to top button