धुळयाच्या कारागृहातून आरोपीचे पलायन; तासाभरात आरोपी अटकेत  | पुढारी

धुळयाच्या कारागृहातून आरोपीचे पलायन; तासाभरात आरोपी अटकेत 

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळयाच्या कारागृहातून बाल लैंगिक अत्याचाराच्या गुन्हयातील आरोपीने भिंतीवरुन उडी मारुन पलायन केल्याची घटना मंगळवारी (दि. २९) घडली आहे. या आरोपीस धुळे शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांच्या पथकाने अवघ्या एका तासात बेडया ठोकल्या. पण, तरीही कारागृहाची सुमारे दहा ते बारा फुटाच्या भिंतीवरुन उडी मारुन आरोपी पळुन जाण्याची घटना पहिल्यांदाच घडल्याने कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

धुळे शहर परिसरातील रहिवासी असणारा अर्जुन रंगनाथ आव्हाड या युवकास बाल लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आले होते. सध्या त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत असल्याने त्याला सुमारे 15 दिवसांपासून कारागृहात ठेवण्यात आले होते. आज सकाळपासून कारागृहात आरोपी व कैदींना कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठीचा कार्यक्रम लावण्यात आला होता. याच वेळी सर्व आरोपींना कोठडीतून आवारात आणले होते. यावेळी अचानक आव्हाड याने भिंतीवरुन उडी मारुन धुम ठोकली. 

ही बाब तातडीने कारागृह प्रशासनाच्या लक्षात आल्याने त्यांनी ही माहिती शहर पोलिसांना दिली. त्यामुळे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख हे पथकासह कारागृहात पोहोचले. त्यांनी तातडीने आव्हाड याचा शोध घेण्यासाठी पथकास रवाना केले. यावेळी एका तासाच्या कालावधीत या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे. 

दरम्यान धुळे कारागृह 18 व्या शतकात तयार करण्यात आले असुन कारागृहाच्या प्रवेशव्दाराजवळच्या भिंती सुमारे दहा ते बारा फुटाच्या आहेत. याशिवाय प्रवेशव्दाराजवळ दोन ठिकाणी दरवाजाच्या अडथळे असुन येथे नेहमी कारागृह पोलिसांचा राबता असतो. या बरोबरच कारागृहाच्या आवारात देखिल चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला असतो. तर भिंतीच्या बाहेर देखिल पोलिस कर्मचारी तैनात असतात. त्यामुळे आतापर्यंत या कारागृहातून आरोपी पळून गेल्याची घटना घडली नाही. पण आज ब्रिटीशकालीन भिंतीवरुन उडी मारुन पळून जाण्यात युवक आरोपीने यशस्वी प्रयत्न केला. त्यामुळे कारागृहाच्या सुरक्षेच्या बाबतीत तातडीने आणखी उपाययोजना आवश्यक असल्याची बाब पुढे आली आहे.  

Back to top button